पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्याला अधिकाधिक लसींचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात मात्र तेवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे अदर पूनावला यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पहाता महाराष्ट्र आणि देशासाठी पूनावाला यांनी महत्त्वाची भूमिका घ्यायला हवी होती. पुण्यामध्येच लस तयार करण्याचा कारखाना (प्लांट) असल्याने आपल्याला अधिक लस कशी मिळेल ? यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने विधान भवन येथे ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमवेत राज्यातील अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली. प्रारंभी सिद्ध होणारी लस दुसर्या देशात देण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता जाणवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.