ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – कल्याण पश्चिम येथे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी श्वास हॉस्पिटल आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी येथील कोविड केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच लाल चौकी येथील स्मशानभूमीलाही भेट देऊन आढावा घेतला. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिममधील येथील परिस्थितीची त्यांनी पहाणी केली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे; मात्र रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा असल्याचे संबंधित पहाणीत जाणवले. त्यानंतर किरीट सोमय्या आणि भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
कोरोनाच्या काळात रुग्णांना आणि नातेवाइकांना अनेक अडचणी येत आहेत, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत, तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे क्षमतेपेक्षा अल्प रुग्ण घेतले जात आहेत, रुग्णालयात बेड शिल्लक आहेत; मात्र ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याचे चित्र आढळून आले आहे, यावर तातडीने कार्यवाही करून रुग्णांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आयुक्तांकडे केली.