पुणे येथील पूजनीय स्वामी माधवानंद यांना देवाज्ञा

पूजनीय स्वामी माधवानंद

पुणे – सर्वांचे श्रद्धेय स्थान असलेले येथील पूजनीय स्वामी माधवानंद यांना २९ एप्रिल या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास देवाज्ञा झाली. याविषयी स्वरूपयोग प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त मंडळाने दिलेल्या संदेशात ‘स्वामी माधवानंद यांच्या चैतन्यमय अस्तित्वातून ते आपल्याला सदैव मार्गदर्शन करत रहातील, यावर नितांत श्रद्धा ठेवून आपण साधनेत निरंतर तत्पर राहूया !’, असे भक्तगणांना कळवण्यात आले आहे.

स्वामी माधवानंद यांचा संक्षिप्त परिचय

आदिनाथांपासून संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि स्वामी स्वरूपानांद (पावस) यांच्याकडून स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे स्वामी माधवानंद हे एक उत्तराधिकारी होते. स्वामीजी म्हणजे पूर्वायुष्यातील डॉ. माधव नगरकर यांनी पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून वनस्पतीशास्त्रातील कवकशास्त्र (मायकॉलॉजी) या विषयात ‘लायकेन्स’ या वनस्पती वर्गावर डॉ. परशुराम पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले होते. त्यावर त्यांना पुणे विद्यापिठाची पीएच्. डी. प्राप्त झाली.

स्वामी माधवानंद यांचे लोककल्याणकारी कार्य

स्वामीजींनी वर्ष २०१४-२०१५ मध्ये पुणे येथे स्वरूपयोग आश्रम या आश्रमाची स्थापना केली. युवकांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी, यासाठी स्वामीजींनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी युवकांमध्ये मिळून मिसळून राहून असंख्य तरुणांना सोहम् साधनेचा उपदेश केला. युवकांना एकत्र येऊन साधना करता यावी, यासाठी त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही ठिकठिकाणी युवा केंद्रे चालू केली. या केंद्रांना ते स्वतः मार्गदर्शन करत.