आरोग्यरक्षक सक्षम हवेत !

कोरोनाने जगभर थैमान घातले असतांना या माध्यमातून समाजघटकांच्या मानसिकता पुढे येत आहेत. कोरोनाचा हा आपत्काळ आपल्याला बरेच काही शिकवून जात असतांना या मानसिकताही आपल्याला आत्मचिंतनास प्रवृत्त करण्यात मोठा वाटा उचलत आहेत, असे म्हणता येईल. कोरोनाशी प्रत्यक्ष लढाई करण्यात डॉक्टरांची भूमिका मोठी आहे. आज या समाजघटकाची मानसिक स्थिती मात्र म्हणावी तेवढी स्थिर नसल्याचे काही उदाहरणांवरून लक्षात येते. काही दिवसांपूर्वी एका डॉक्टर महिलेचा व्हिडिओ प्रसारित (व्हायरल) झाला होता. त्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी सांगतांना त्यांना रडू कोसळले. उत्तरप्रदेशातील एका महिला डॉक्टरने कोरोनाचा संसर्ग झाल्याने आलेल्या निराशेतून नुकतीच आत्महत्या केली. कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा सतत काम करून डॉक्टरांनाच मानसिक समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे पुढे आले होते.

कोरोनामुळे निर्माण झालेली विदारक परिस्थिती आणि साधनसामग्रीचा तुटवडा यांमुळे डॉक्टरांवर साहजिकच भार पडत आहे. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती डळमळणे, हे समजू शकतो; परंतु आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे, सर्व स्तरांवर त्याच्याशी लढणे, हे एक डॉक्टर म्हणून आवश्यक आहे. डॉक्टर हा समाजघटक जर खंबीर असेल, तर सामान्य जनतेला धीर येऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचे आत्मबळ वाढणेच आवश्यक आहे. केवळ लौकिक शिक्षण घेऊन नाही, तर साधनेनेच आत्मबळ वाढते. साधना करणे अपरिहार्य आहे, हे आतातरी डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवे.

दुसरीकडे काही ठिकाणी डॉक्टर कर्तव्यापासून विन्मुख होतांना दिसत आहेत. जबलपूर येथे ऑक्सिजनअभावी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची तडफड होत असतांना डॉक्टरांनी तेथून पलायन केले. काही मासांपूर्वी शिकाऊ डॉक्टरांनी कोरोनाचे काम करण्यासाठी नकार दिला होता. कोणत्याही परिस्थितीत स्वत:चे कर्तव्य काय ? याची डॉक्टरांना जाण नसेल, तर त्यांना आरोग्यरक्षक म्हणावे का ? अनेक वर्षे खर्ची घालून शिकलेल्या अभ्यासक्रमाचा मग उपयोग काय ? यावरून डॉक्टरांना नैतिक शिक्षणाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. अर्थात् यासाठीही साधना शिकवणे, हाच पर्याय आहे !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.