विरार रुग्णालयाला लागलेल्या आगीचे प्रकरण
ठाणे, २६ एप्रिल (वार्ता.) – विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर आता रुग्णालयाचे मालक आधुनिक वैद्य शैलेश पाठक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शहा या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होता. त्यानंतर पालिकेच्या प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त अंगाई जयसिंगराव साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापक, आधुनिक वैद्य, कर्मचारी यांच्यावर अर्नाळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याचे अन्वेषण विरार गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले.
अग्नीशमन दलाकडून देण्यात येणार्या ना हरकत प्रमाणपत्राची मुदत मार्च मासातच संपली असल्याचे दिसून आले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीने १५ दिवसांत चौकशी करून राज्य शासनाला अहवाल सादर करायचा आहे, असे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.