नवी देहली – कोरोना महामारीच्या या काळात लसीला किती महत्त्व आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, तिचा लाभ ४५ वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध होणार आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक कार्यक्रम ‘मन की बात’मधून केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज कोरोना आपल्या सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांचे दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात आत्मविश्वास संचारला होता; मात्र या दुसर्या लाटेने देशाला मोठा हादरा दिला आहे. आपल्याला कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या सल्ल्यालाच अधिक प्राधान्य द्यायचे आहे. भारत सरकार संपूर्ण शक्तीनिशी राज्य सरकारांसमवेत उभे आहे. राज्य सरकारेदेखील त्यांचे कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.