माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यास २४ एप्रिलला काम बंद आंदोलन करू ! – नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील

नवी मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) –  राज्य शासनाने माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना २३ एप्रिलच्या रात्रीपर्यंत रेल्वे आणि बसने प्रवास करण्याची अनुमती दिली नाही, तर २४ एप्रिलला एक दिवसाचा लाक्षणिक संप करू, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. माथाडी कामगार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची एकही गाडी खाली करणार नाही अथवा भरणार नाही, असे ते म्हणाले.

नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये; म्हणून माथाडी कामगार जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, त्यांना विमा संरक्षणकवच द्यावे, त्यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास रेल्वे, बससेवा आणि इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास अनुमती द्यावी. या मागण्या मान्य न केल्यास २४ एप्रिलला सर्व बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेणे भाग पडेल.