शांत, प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारे मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. वसंत मुरकुटे (वय ६५ वर्षे)  !

श्री. वसंत मुरकुटे

१. शांत आणि नम्र

अ. ‘श्री. मुरकुटेकाकांचा स्वभाव पूर्वीपासूनच फार शांत आहे. त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदुता आणि नम्रता जाणवते. आम्ही त्यांचा आवाज कधी वरच्या पट्टीत गेल्याचे ऐकले नाही.’ – सौ. मनाली नाईक आणि सौ. प्रीती गुरव, मुंबई

आ. ‘पूर्वी ते आमच्या सेवांचे नियोजन करायचे. तेव्हाही ते सर्व प्रसंग शांतपणे हाताळायचे.

२. प्रेमळ

२ अ. काका सेवेतील सर्वच साधकांना प्रेमाने हाताळतात.

२ आ. नव्याने सेवा शिकणार्‍या साधकाला प्रेमाने आणि शांतपणे सेवा समजावून सांगणे : पूर्वी काका आमच्या घरी नामपट्टी आणि छायाचित्रे यांचा प्रत्यक्ष साठा घेण्यासाठी यायचे. माझे यजमान ही सेवा नव्यानेच करत होते. त्या वेळी त्यांच्याकडून काही चुका व्हायच्या. त्या वेळी मुरकुटेकाका त्यांना पुनःपुन्हा प्रेमाने समजावून सांगायचे आणि सेवेतील सर्व बारकावे शिकवायचे. त्यामुळे श्री. गुरव यांना ती सेवा आवडू लागली. ‘एखाद्या सेवेतील नवीन साधकांना कसे प्रेमाने हाताळायचे आणि कसे शिकवायचे ?’, हे काकांना चांगले जमते.’ – सौ. प्रीती गुरव

३. इतरांना साहाय्य करणे

‘मुंबई जिल्ह्यातील साधकांना सेवेअंतर्गत काही शंका असल्यास ते त्याविषयी काकांनाच विचारतात. काकाही ‘मी ही सेवा पहात नाही’, असे न सांगता साधकांचे शंकानिरसन होईपर्यंत साधकांना सर्व प्रकारे साहाय्य करतात.’ – सौ. मनाली नाईक

४. इतरांचा विचार करणे

‘काकांकडे पंचांगाच्या विज्ञापनांविषयीची सेवा आहे. काकांकडे कधीही आपण पंचांगाच्या विज्ञापनांविषयी आढावा विचारला, तर काका तो लगेच देतात. ते स्वतःच्या सेवा बाजूला ठेवून ‘समोरच्याने जे विचारले, त्यासाठी प्रथम प्राधान्य देतात’, असे अनुभवले आहे.’ – सौ. प्रीती गुरव

५. सेवेची तळमळ

५ अ. घरचे दायित्व सांभाळूनही सेवा पूर्ण करणे : ‘आताच्या या आपत्कालीन परिस्थितीत काकांच्या घरीही अडचणी आहेत. त्यांच्या सूनबाईंना कोरोना झाल्यामुळे सूनबाईंना दुसरीकडे ‘क्वारंटाइन’ केले होते. काकांच्या पत्नींचीही प्रकृती बरी नसते. त्यामुळे त्यांच्या ४ वर्षांच्या लहान नातीचे सर्व काकांनाच करावे लागत होते. ‘दिवसभर स्वतःचे उपाय, नातीचे सर्व आवरणे, घरातील सर्व कामे’ हे सर्व काका प्राधान्याने करायचे आणि रात्री जागून पहाटेपर्यंत सर्व सेवा पूर्ण करायचे.

५ आ. विज्ञापनांसंबंधीची सेवा झोकून देऊन आणि परिपूर्ण करणे : हिंदु जनजागृती समितीच्या संबंधित सेवा, पंचांगाची विज्ञापने, साप्ताहिक आणि मासिक यातील विज्ञापने, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांची विज्ञापने या सर्व सेवा काका स्वतः दायित्व घेऊन करण्याचा सतत प्रयत्न करतात. वरील सर्व सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी काकांची धडपड असते. ते आपल्या सर्व सेवा समपिर्र्तभावाने आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.’ – सौ. मनाली नाईक

५ इ. दैनिक वितरण करणे : ‘काका दैनिक वितरण सेवाही मनापासून आणि आनंदाने करतात. ते सकाळी चालत जाऊन सर्व दैनिकांचे वितरण करून नंतर कामाला जायचे. त्यांनी कधीही त्या सेवेत सवलत घेतली नाही.

५ ई. ग्रंथप्रदर्शनावरील हिशोबाची सेवा करणे : महाशिवरात्रीला काकांना आपण कोणत्याही ग्रंथ प्रदर्शनावर सेवा दिली, तरी ते लगेच स्वीकारतात आणि सर्व हिशोब पूर्ण करतात. ते कधीच ‘माझ्याकडे जिल्ह्याच्या सेवा आहेत. मला जमणार नाही’, असे म्हणत नाहीत.

५ उ. परिपूर्ण सेवा करणे : गुरुपौर्णिमा सोहळ्यात किंवा धर्मसभेत काकांना बर्‍याच वेळा ग्रंथप्रदर्शनाचा हिशोब करण्याची सेवा असते.  कितीही उशीर झाला, तरी ते नेहमी ती सेवा पूर्ण करूनच घरी जातात.’

६. कृतज्ञताभाव

काकांचा मुलगा श्री. अभिषेक याला सेवा सांगण्यासाठी मी कधी काकांच्या भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर ‘आता माझ्या मुलाला सेवा मिळणार’ या विचाराने त्यांना आनंद होतो आणि तो त्यांच्या शब्दांतून व्यक्त होतो. ते म्हणतात, ‘‘हो ताई, अभिषेक करील ही सेवा.’’ आपण अनेकदा सेवेसाठी त्यांची चारचाकी गाडी वापरतो. तेव्हाही काकांना आनंद होऊन कृतज्ञता वाटते.’  – सौ. प्रीती गुरव, मुंबई

७. भाव

‘काकांच्या सूनेला ‘क्वारंटाईन’ केले; म्हणून त्यांना घरातील पुष्कळ कामे करावी लागत होती. या परिस्थितीतही त्यांनी ‘मला सेवा करण्यास अडचण आहे’, असे कधीही सांगितले नाही. याउलट ‘या सर्व सेवेच्या नियोजनामुळे मला सतत सत्मध्ये रहाता येते. सेवेमुळे मला घरातील परिस्थितीचा ताण येत नाही. ही श्री गुरूंची केवढी मोठी कृपा आहे’, असा त्यांचा भाव होता.’ – सौ. मनाली नाईक