अमरावती – राज्य सरकारने केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी त्यांचे सहकार्य मिळवावे, असा उपदेश येथील खासदार नवनीत राणा यांनी २१ एप्रिल या दिवशी राज्य सरकारला दिला आहे. नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी साहाय्य करत आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, पीपीई किट, व्हेन्टिलेटर, औषधे आणि इतर आवश्यक साहित्य यांचा पुरवठा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आपले दायित्व योग्य रितीने पार पाडून महाराष्ट्राला योग्य ती साथ देत आहेत; मात्र या संकटसमयी नागरिकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असून महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका टिप्पणी न करता त्यांच्याकडून अधिकाधिक सहकार्य मिळवून घ्यावे. ही वेळ राजकारण करण्याची नव्हे, तर माणसे जगवण्याची आहे, असे आवाहन त्यांनी केले.