१. कॅसिनो, मद्यालये, रेस्टॉरंट, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, एंटरटेनमेंट पार्क, चित्रपटगृहे, जीम, पार्लर निम्म्या क्षमतेने कार्यरत रहातील. सर्व ‘जलतरण तलाव’ आणि शैक्षणिक संस्था बंद रहाणार आहेत.
२. गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी पुढील दिनांक गोवा शालांत मंडळ परीक्षेच्या १५ दिवस आधी घोषित करणार आहे.
३. २३ एप्रिल या दिवशी होणार्या राज्यातील ५ नगरपालिकांच्या निवडणुका पूर्वी घोषित केल्याप्रमाणेच होणार आहेत. कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून निवडणूक आणि मतमोजणी केली जाणार आहे.
४. मंदिर, मशीद आणि चर्च यांना सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाही; मात्र अल्प लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करता येतील.
५. राज्यात विवाह समारंभात ५० हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत, तसेच अंत्यसंस्काराला २० हून अधिक लोक सहभागी होऊ शकणार नाहीत.
६. राज्यातील उद्योगांवर कोणतेही निर्बंध नाहीत आणि आर्थिक उलाढाल नेहमीप्रमाणे चालूच राहील.
७. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून जिल्हा प्रशासन ‘लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र’ (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित करणार आहे. समुद्रकिनारपट्टीतील काही भाग ‘लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र’ घोषित करण्यात येणार आहे. संबंधित खात्याने या ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोव्यात दिवसभरात दीड सहस्र नवीन रुग्ण, तर १७ रुग्णांचा मृत्यू
पणजी – राज्यात २१ एप्रिल या एकाच दिवशी कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडण्याचा नवीन उच्चांक स्थापित झाला आहे. एकाच दिवशी कोरोनाबाधित १ सहस्र ५०२ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर कोरोनाबाधित १७ रुग्णांचे निधन झाले आहे. राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ती ९ सहस्र ३०० झाली आहे. २१ एप्रिल या दिवशी ४२६ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. २१ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक ४ सहस्र ८९ चाचण्या करण्यात आल्या आणि तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३६.७३ टक्के आहे. २१ एप्रिल या दिवशी राज्यात कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माशेल येथील २७ वर्षीय व्यक्ती ही सर्वांत अल्प वयाची होती, तर कळंगुट येथील ७९ वर्षीय महिला सर्वांत अधिक वयाची आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची राज्यातील एकूण संख्या ९४३ झाली आहे.