१. देवतांच्या चित्रासमोर ठेवलेल्या नारळाकडे पाहून आलेल्या अनुभूती
१ अ. नारळांकडे पाहून भावजागृती होणे : ‘१५.२.२०२० या दिवसापासून आम्ही प्रतिदिन रामनाथी आश्रमातील एका सभागृहात ‘श्रीराम’ हा नामजप करण्यासाठी बसत होतो. सभागृहात ठेवण्यात आलेल्या ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण’ यांच्या चित्रांसमोर नारळ ठेवले होते. त्या नारळांकडे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
१ आ. ‘नारळ गरुडासारखा दिसून श्रीविष्णु त्यावर बसून आला आहे’, असे दिसणे : एकदा मी सभागृहात ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण’ यांच्या चित्रांच्या उजव्या बाजूला नामजपासाठी बसले होते. तेव्हा मला त्या चित्रांसमोर ठेवलेला नारळ गरुडासारखा दिसत होता. ‘साक्षात् श्रीविष्णु भक्तांसाठी गरुडावर बसून आला आहे’, असे दृश्य मला दिसत होते. त्या दिवशी माझा नामजप पुष्कळ चांगला झाला.
१ इ. नारळ हनुमंतासारखा दिसून दास्यभाव जागृत होऊन प्रार्थना होणे : दुसर्या दिवशी सभागृहात मी ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण’ यांच्या चित्रांच्या डाव्या बाजूला बसले होते. त्या वेळी माझ्या मनामध्ये दास्यभक्तीचा भाव आपोआप दाटून आला. अकस्मात् माझी दृष्टी नारळांकडे गेली. तेव्हा मला तो नारळ हनुमंताच्या तोंडवळ्यासारखा दिसत होता. त्यानंतर माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला आणि आपोआप प्रार्थना व्हायला लागल्या. ‘आम्ही करत असलेल्या प्रार्थना फलद्रूप होऊ दे’, अशीही प्रार्थना होऊ लागली.
२. सद्गुरु गाडगीळकाकांच्या अनाहत चक्रावर परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन सतत १० मिनिटे होणे
२९.३.२०२० या दिवशी ‘श्रीराम’ हा नामजप करतांना माझी भावजागृती होत होती आणि प्रार्थना भावपूर्ण होत होत्या. आमच्या समवेत सद्गुरु गाडगीळकाकाही नामजपाला बसले होते. त्यांच्याकडे पहात नामजप करतांना माझे मन एकाग्र होत होते. मी त्यांच्या अनाहत चक्राकडे पहात नामजप करत होते. त्या वेळी मला त्यांच्या डाव्या बाजूच्या खिशाच्या जागेवर परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसू लागला. जवळ जवळ १० मिनिटे मला त्यांच्या अनाहत चक्रापाशी परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसत होता. माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला भावाश्रू आले.
‘हे गुरुदेवा, ‘आपण सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी आहात’, याची मला अनुभूती दिली’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती जयश्री मुळे, सनातन आश्रम, गोवा.(१६.५.२०२०)