जालना – १ मेनंतर राज्यात कोरोनाची परिस्थिती काय असेल, त्यावर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास ती वाढवली जाईल, असे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ एप्रिल या दिवशी येथे केले. ‘प्रत्येकाचा जीव वाचावा, यासाठी १५ दिवस संचारबंदीचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय यशस्वी झाला पाहिजे, यासाठी जनतेने सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर न पडता संसर्ग होईल अशा गोष्टी करू नयेत. सध्याचा संचारबंदीचा १५ दिवसांचा कालावधी संपल्यावर नेमकी काय परिस्थिती राहील, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ’, असेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासमवेत १७ एप्रिल या दिवशी राज्यातील आरोग्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात टोपे माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राला २ सहस्र टन ऑक्सिजन देण्याची केंद्र सरकारकडे मागणी
‘केंद्र सरकारकडून १५ एप्रिलपासून ऑक्सिजन पुरवठा चालू झाला असून कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राला २ सहस्र २ सहस्र २०० टन प्रतिदिन ऑक्सिजन द्यावा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन किमान ५०० टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा राज्यांतून रेल्वेद्वारे ऑक्सिजन आणण्याचा विचार आहे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजनची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्याचे ९८ टक्के ‘प्युरिफिकेशन’ करून ते रुग्णांना देता येऊ शकेल. अशा प्रकारचे प्लान्ट उभारण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत’, असे त्यांनी सांगितले.