कोरोनाच्या वाढत्या संसर्गकाळात हलगर्जीपणा करणारे रुग्णालय प्रशासन !
जळगाव – कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह स्वतंत्र प्लास्टिक पिशवीत (बॉडी रॅपिंग बॅग) नातेवाइकांच्या कह्यात देणे बंधनकारक असतांना १६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील साधना रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात देण्यात आला. ‘प्लास्टिक पिशवी उपलब्ध नसल्याने आणि नातेवाइकांनी मृतदेह कह्यात देण्याची घाई केल्याने हा प्रकार घडला’, असे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले आहे. डॉ. मोहसीन शहा हे रुग्णालयाचे संचालक आहेत. वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. शुक्रवारी शहरातील अनेक औषधालये चालू होती आणि शहरात या पिशव्यांचा पुरेसा साठा होता, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रुग्णालय प्रशासनाने या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ‘न्यूमोनिया’ असे नोंदवले आहे. कोरोनाबाधित रुग्ण असतांना मृत्यूचे कारण रुग्णालयाकडून लपवण्यात तर येत नाही ना ? कोरोनामुळे होणार्या मृत्यूची खरी आकडेवारी लपवण्याचा डाव तर नाही ना ? अशी शंका नातेवाइकांना येत आहे.
डॉ. मोहसीन शहा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !
अधिवक्ता निरंजन चौधरी यांचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन !
साधना रुग्णालयाचे डॉ. मोहसीन शहा यांनी वैद्यकीय सेवा बजावण्यात कुचराई केल्याप्रकरणी, तसेच जाणीवपूर्वक संसर्ग वाढवण्यासाठी हे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी शहरातील अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त रुग्णालयात आतापर्यंत किती कोरोनाबाधित रुग्ण भरती झाले ? किती मृत झाले ? किती मृतदेहांना त्यांनी ‘रॅपिंग बॅग’मध्ये गुंडाळून पाठवले, या गोष्टींचीही चौकशी होणे आवश्यक आहे.