सांगली, १५ एप्रिल – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या परत वाढू लागल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना आरोग्य केंद्र परत चालू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी १५ एप्रिल या दिवशी आरोग्य केंद्रास भेट देऊन पहाणी केली. १७ एप्रिलपासून मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील रुग्णांना जिल्हा क्रीडा संकुल येथे स्थानांतरित करण्यात यावे, तसेच १९ एप्रिलपासून सामान्य कोरोनाबाधितांसाठीही येथेच उपचार करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पहिल्या लाटेच्या वेळी आरोग्य कर्मचार्यांनी अतिशय चांगले काम केले. आपत्ती कायद्यांतर्गत आरोग्य कर्मचार्यांना येथे काम करण्यासाठी नियुक्तीचे आदेश काढले असून त्यांनी येथे काम करणे बंधनकारक आहे. या संदर्भात कुणीही परस्पर निर्णय घेऊ नये. काही अडचण असल्यास ती ‘नोडल’ अधिकार्यांना सांगावी. त्यांच्या अडचणींचे निराकरण केले जाईल.’’