सरकारी रुग्णालयातील अनास्थेचे बळी ! या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
नगर, १५ एप्रिल – येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या कक्षात ऑक्सिजन सिलिंडर पालटण्यास विलंब झाल्याने ११ एप्रिल या दिवशी २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी रुग्णाच्या एका नातेवाइकाने व्हिडिओद्वारे तक्रार केली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळला आहे. ‘नातेवाइकांच्या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल’, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले.
ऑक्सिजन सिलिंडर संपल्यावर तो पालटणारे कर्मचारी जागेवर नव्हते. त्यांना शोधण्यात बराच काळ गेला. या काळात सर्वच रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. यासंबंधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा म्हणाले की, रुग्णालयात आवश्यक ती साधनसामुग्री आहे. रुग्णांवर योग्य ते उपचार केले जातात. कोरोनाबाधितांचे मृत्यू होत असले, तरी ऑक्सिजन नसल्याने कुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. हलगर्जीपणा आढळून आला, तर योग्य ती कारवाई केली जाईल.