परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा गृहविभागाचा आदेश !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप आणि राज्यशासनाला न्यायालयात प्रतिवादी करणे, हे अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग आहे का ? याविषयी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा आदेश गृहविभागाकडून देण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे अन्वेषण करणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या अधिकार्‍यांचे अन्वेषण करणे, नोटीस देणे आणि त्यांचे जबाब नोंदवणे हे अधिकार गृहविभागाने संजय पांडे यांना दिले आहेत.

मनसुख हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेले जिलेटीन या प्रकरणांत कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून गृहविभागाने परमबीर सिंह यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांचे केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्याचीही मागणी केली आहे. परमबीर सिंह सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर कार्यरत आहेत.