‘मला निवडून दिले, तर चंद्रावर यात्रा घडवून आणीन’, ‘फुकट हेलिकॉप्टर देईन’, ‘तुम्हाला तीन मजली घर बांधून देईन’, ‘सोन्याचे अलंकार देईन’, ‘तुम्हाला घरकामाला अडचणी येऊ नयेत; म्हणून रोबोट देईन’ आणि त्याही पुढे जाऊन ‘मतदारसंघात आल्हाददायक वातावरणाच्या निर्मितीसाठी ३०० फूट बर्फाळ डोंगर बांधीन’, अशी आश्वासने देणारे तमिळनाडूतील थुलम सर्वानन् भलतेच गाजले. तमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार, याचा निकाल २ मे या दिवशी लागणार. असे असले, तरी या निवडणुकीत चर्चा होती ती सर्वानन् यांनी दिलेल्या आश्वासनांची. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अशा प्रकारची आश्वासने दिल्यामुळे ३३ वर्षीय सर्वानन् यांना बर्याच जणांनी वेड्यात काढले. ‘असे कधी होऊ शकते का ?’, ‘मतदारांना चंद्रावर यात्रा घडवून आणणे सोपे आहे का ?’ ‘असे करण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का ?’ असे विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तमिळी जनतेला पडलेल्या प्रश्नातच सर्वानन् यांचे यश दडलेले आहे. सर्वानन् यांंना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तसेच ते काही श्रीमंत उमेदवार नाहीत. निवडणुकीला उभे रहातांना डिपॉझीट भरण्यासाठी त्यांनी २० सहस्र रुपये उधार घेतले आहेत. असे असूनही ज्या आश्वासनांची पूर्तताच होऊ शकत नाही, अशी आश्वासने ते का देत होते ? लोकांमध्ये जागृती व्हावी, त्यांनी राजकीय पक्षांच्या आश्वासनांना बळी पडू नये, यासाठी त्यांनी निवडणुकीला उभे राहून अशा घोषणा करण्याची अभिनव शक्कल लढवली. ‘राजकीय पक्ष दाखवत असलेल्या आमीषांना तुम्हाला बळी पडायचे असेल, तर तुमचे मत कचरापेटीत टाका’, असे ते म्हणाले होेते. यासाठीच त्यांनी त्यांचे निवडणूक चिन्ह कचरापेटी निवडले होते. भारतात लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका असोत, त्यासाठी राजकीय पक्षांकडून पाण्यासारखा पैसा व्यय केला जातो. या काळात दारू किंवा पैसे यांनी भरलेल्या पेट्या आदी गोष्टी मिळण्याचे प्रमाण वाढते. तमिळनाडूतही मोठ्या प्रमाणात असले प्रकार घडतात. एका वृत्तानुसार निवडणुकीच्या काळात तमिळनाडूत ४२८ कोटी रुपयांचा बेहिशोबी ऐवज पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. ४२८ कोटी रुपयांच्या बेहिशोबी ऐवजामध्ये २२२ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच १७६ कोटी ११ लाख रुपये मूल्याचे सोने आदींचा समावेश आहे. हा ऐवज मतदारांना वाटण्यासाठी होता, हे वेगळे सांगायला नको. हे चित्र सर्वानन् यांच्यासारख्या होतकरू तरुणांना पालटायचे आहे. त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग अभिनव आहे. लोकांवरही त्याचा कितपत परिणाम होतो, हेही दिसेलच. वास्तविक स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेला ‘राजकीय पक्षांच्या आमीषाला बळी पडू नका’, हे सांगावे लागते, हे लज्जास्पद आहे.
तमिळनाडूवरील कर्जाचा डोंगर !
तमिळनाडूमधील निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून नेहमीच आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. एरव्ही जनतेकडे पाठ फिरवणारे सर्वपक्षीय उमेदवार जनतेला डोक्यावर घेऊन त्यांचे मन राखतांना दिसतात. लोकशाहीत जनता ही राजा असते, असे बोलले जाते. निवडणुकीच्या काळात तमिळनाडूची जनता प्रत्यक्षात ही गोष्ट अनुभवते. असे असले, तरी या फुकट्या संस्कृतीने तमिळनाडूच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. सद्यःस्थितीत राज्यावर ४ लाख ८५ सहस्र ५०२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरत्या वर्षात हा आकडा ५ लाख कोटींवर जाणार आहे. आता ‘हे कर्ज आणि आश्वासने यांचा काय संबंध ?’ असा प्रश्न आपल्या मनात येईल. हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला तमिळनाडूची मागील १५ वर्षांची आर्थिक स्थिती लक्षात घ्यायला हवी. जनतेवर अशी खैरात करण्याची कुसंस्कृती द्रमुकचे सर्वेसर्वा एम्. करुणानिधी यांनी अस्तित्वात आणली. करुणानिधी वर्ष २००६ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. सत्तेवर येण्याआधी त्यांनी त्यांच्या घोेषणापत्रामध्ये फुकट दूरचित्रवाहिनी संच, २ रुपयांत १ किलो तांदूळ, भूमी नसणार्यांना फुकट भूमी, फुकट गॅस जोडणी आदी विविध आश्वासने दिली. त्याला लोक भूलले आणि त्यांनी करुणानिधी यांना निवडून आणले. त्या वेळी तमिळनाडूवर ५७ सहस्र ४५७ कोटी रुपयांचे कर्ज होते. आता लोकांना दिलेली आश्वासने पाळण्यासाठी द्रमुक सरकारने पाण्यासारखा पैसा व्यय केला. त्यामुळे वर्ष २०१०-११ या वर्षी राज्यावर १ लाख, १ सहस्र ३४९ कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्यानंतर अण्णाद्रमुक सरकार आले. सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी अशा प्रकारे लोकांना वेगवेगळी आश्वासने दिली. त्यांच्या पक्षाने १० वर्षे शासन केले. आता कर्जाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. हे कर्ज कोण फेडणार ? हे पैसे राजकीय पक्ष फेडत नसतात. त्यासाठी जनतेच्या खिशाला कात्री लावली जाते. जनता तात्पुरत्या आमीषांना भुलते; मात्र त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार केला जात नाही. त्यामुळेच राजकीय पक्षांचे फावते.
समाजाचे दोष दाखवणारे नेतृत्व हवे !
सर्वानन् यांच्यासारख्या उमेदवारांचे महत्त्व येथे अधोरेखित होते. ‘घरकामासाठी रोबोट देणे’ किंवा ‘हेलिकॉप्टर देणे’, हे जसे राजकीय उमेदवारांना शक्य नाहीत, तसेच २ रुपयांत तांदूळ पुरवणे, फुकट वीजजोडणी करणे आदींची पूर्तता करणे राजकीय उमेदवारांना शक्य नाही, हे आपण जाणून घ्यायला हवे. एखादी गोष्ट फुकट वाटायची असेल, तर कुणाच्या तरी खिशातून हा पैसा व्यय करावा लागतो. फुकट कुकर, साड्या यांचे वाटप करतांना जो व्यय येतो, तो पैसा नंतर जनतेच्याच खिशातून कर किंवा अन्य स्वरूपात आकारला जातो. विकासकामांमध्ये होणार्या भ्रष्टाचारामागेही हेच कारण आहे. भारतीय जनतेला हे समजत नाही कि समजूनही ती आमीषांना बळी पडते, यावर विचार व्हायला हवा.
जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते. त्यामुळे समाजाचे परखडपणे दोष दाखवणारे नेतृत्व समाज सहसा स्वीकारत नाही. हे ठाऊक असूनही कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजहितासाठी अनवट मार्ग स्वीकारणारे सर्वानन् यांच्यासारखे लोक, ही समाजाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. असे ‘सर्वानन्’ सर्वत्र असल्यास राष्ट्राचे कल्याण निश्चित होईल !