कोरोना महामारीमुळे आलेला आपत्काळ आणि दळणवळण बंदीच्या काळात सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. अशा वेळी सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. त्याचा समाजातील पुष्कळ लोकांना लाभ झाला. अनेक जण साधना आणि काही जण सेवा करू लागले, तर अनेकांना सुंदर अनुभूतीही आल्या. त्यामुळे लोकांच्या मनात सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. ३.४.२०२१ या दिवशी या सत्संगांना एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय देत आहोत.
१. डॉ. सुवर्णा गुरव, पट्टणकुडी
१ अ. सत्संगांमुळे अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन होऊन आयुष्यभर पुरेल एवढी सत्संगाची शिदोरी मिळणे : सनातन संस्थेच्या सत्संगांमुळे ‘गुरुकृपा काय असते ?’, याची मला पावलागणिक प्रचीती येत आहे. हा नश्वर प्रपंच त्यांच्याच कृपायोगानुसार चालू आहे. दळणवळण बंदीमध्ये त्यांनी दिलेल्या सत्संगाची शिदोरी आयुष्यभर पुरेल एवढी आहे. घरात बसून १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा मला लाभ झाला. ‘आपण प्रत्यक्ष तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलो आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला.’ तसेच ठाऊक नसलेल्या कित्येक संतांची शिकवण आणि त्यांचे दर्शन यांचाही लाभ झाला.
१ आ. सत्संगामुळे स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न होऊ लागणे आणि सांसारिक ताप नष्ट होऊन उपासना घडत असल्यामुळे कृतज्ञता वाटणे : प्रत्येक दिवस मला सत्संगात रहाण्याचे भाग्य लाभत आहे. त्यामुळे माझा नियमित नामजप आणि प्रार्थना होत आहे. सर्व सांसारिक समस्या, अडचणी आणि चिंता आपोआप नष्ट होऊन माझ्याकडून उपासना घडत आहे. त्याचप्रमाणे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न होऊ लागले असून त्या संदर्भातील ग्रंथांचे वाचन चालू केले आहे. आता माझ्याकडून राग न्यून होण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. गुरुकृपायोगामुळेच या महामारीच्या काळात सुरक्षितच नव्हे, तर गुरुकृपेच्या प्रेमाच्या सावलीत मी राहू शकले आणि भावसत्संगांचा लाभ घेऊ शकले. यासाठी भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. सौ. गीता झिंगे, शिक्षिका
२ अ. सत्संगामुळे घरातील वातावरणात पालट जाणवणे : सत्संग ऐकू लागल्यापासून मी वास्तूची नियमित स्वच्छता आणि शुद्धी करत आहे. ‘घरातील सर्वांना सत्संग ऐकू जावा’, यासाठी मी तो मोठ्या आवाजात लावते. पूर्वी घरात रखरख जाणवायची. आता शांत वाटते. माझ्या यजमानांच्या कानावर सत्संग पडल्यामुळे त्यांच्या स्वभावातही पालट जाणवत आहे. ‘हा सत्संग चुकवू नये’, असे ते म्हणतात. आमचे चुलत सासू-सासरे घरी आल्यावर त्यांनाही घरात छान वाटते.
३. सौ. कविता किरण पवार
३ अ. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची मानसपूजा करून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करणे आणि संध्याकाळी शिवमंदिरात गेल्यावर मूर्तीवरील फूल अकस्मात् खाली पडल्याने शिवाने आशीर्वाद दिल्याचे जाणवून पुष्कळ आनंद होणे : ११.३.२०२१ या दिवशी महाशिवरात्र होती. त्या दिवशी मी नित्यनियमाने देवपूजा आणि महादेवाची मानसपूजा केली. मी दिवसभर ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप केला. दिवसभर भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यामुळे माझे मन पुष्कळ आनंदी होते. संध्याकाळी माझे यजमान कार्यालयातून घरी आल्यावर आम्ही दोघे महादेव मंदिरात गेलो. तेथे भगवंताचे दर्शन घेऊन मी भावपूर्ण नमस्कार केला. मी डोळे उघडले, तेव्हा महादेवाच्या मूर्तीवरील फूल अकस्मात् खाली पडले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. माझ्या मागे उभ्या असलेल्या ताई मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळाला.’’ हे ऐकून मला फारच आनंद झाला. अशा अनुभूती भगवंत आपल्याला देतो, तेव्हा जो आनंद मिळतो, तो आपल्याला कुणीही देऊ शकत नाही. असा अत्युच्च आनंद मिळवण्यासाठीच मी साधना करत आहे !
३ आ. नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर सुहास्य वदनाने समोर उभे आहेत’, असे जाणवणे : एकदा नामजप करतांना मला पुष्कळ जांभया येऊन माझ्या दोन्ही डोळ्यांतून पाणी येऊ लागले. नंतर दोन मिनिटांत ‘प.पू. गुरुदेव माझ्या समोर स्मितहास्य करत उभे आहेत’, असे मला जाणवले.’
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |