‘जिल्हा पालक संघा’च्या लढ्याला मोठे यश !
सातारा, ३१ मार्च (वार्ता.) – खासगी शाळा संघाने बोलावलेल्या बैठकीत शाळा शुल्काविषयी सकारात्मक चर्चा होऊन शुल्क अल्प करण्याचा निर्णय झाल्याने ‘जिल्हा पालक संघा’च्या संघटित लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती संघाचे प्रशांत मोदी यांनी दिली.
गत वर्षीपासून ५ वीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. ५ वी ते ९ वीपर्यंतच्या शाळा काही कालावधीसाठी चालू झाल्या होत्या; मात्र कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेऊन त्या पुन्हा बंद करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ‘ऑनलाईन’ शिक्षणाचे आदेश काढले. शाळा बंद असूनही खासगी शिक्षण संस्थांनी पालकांच्या मागे शाळेचे शुल्क (फी) भरण्यासाठी तगादा लावला. शाळा कोणताही विचार न करता व्यावसायिक पद्धतीने शुल्क वसुली करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘सातारा जिल्हा पालक संघा’ची स्थापना करण्यात आली. पालकांचा संघटितपणा पाहून शाळासम्राटांनी पालकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत शाळा शुल्क सवलतीविषयी सकारात्मक चर्चा होऊन शुल्क अल्प करण्यावर एकमत झाले. हा ‘जिल्हा पालक संघा’चा मोठा विजय मानला जात आहे.