कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्धचा खटला रहित !

  • संततीच्या संदर्भात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण

  • कीर्तनात आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा !

  • अंनिस, अन्य ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी संघटना यांना न्यायालयाची चपराक ! आतातरी या संघटना शहाण्या होतील आणि हिंदूंच्या शास्त्रांवर टीका करण्याचे थांबवतील, अशी अपेक्षा मात्र करता येत नाही ! हिंदु धर्मावर टीका करणे, हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने ते न्यायालयाच्या आदेशानंतरही गप्प बसणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे !
  • कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आयुर्वेदाचा संदर्भ दिला असतांना पुरो(अधो)गामी संघटनांनी या शास्त्राला खोटे ठरवण्यासाठीच हा विरोध केला होता, असेच म्हणावे लागेल !
  • संत, कीर्तनकार आदींवर खोटे आरोप करून त्यांना, तसेच हिंदु धर्माला अपकीर्त करणार्‍यांवरही कारवाई होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा !

नगर, ३१ मार्च – ‘कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी केलेले वक्तव्य हे आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील आहे. कीर्तनात अशा ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचे निरीक्षण नोंदवत संगमनेरच्या सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित केला. इंदुरीकर महाराज यांनी ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला, तर मुलगी होते आणि स्त्रीसंग अशीव वेळी झाला, तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते’, असे वक्तव्य केले होते.

त्यामुळे घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० या दिवशी महाराजांविरुद्ध ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता. त्यावर न्यायालयाने दिलेल्या ‘प्रोसेस इश्यू’च्या आदेशाला इंदुरीकर महाराज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

या वेळी कीर्तनकार इंदुरीकर महराज यांच्या वतीने युक्तीवाद करतांना अधिवक्ता के.डी. धुमाळ यांनी इंदुरीकर महाराज यांनी केलेला उल्लेख हा चरक संहितेत असून ‘बी.ए.एम्.एस्.’ या वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमातही हा भाग समाविष्ट असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासह ‘महाराजांच्या ३ घंट्यांच्या कीर्तनात हा केवळ एका ओळीचा संदर्भ आहे. त्यामुळे याची जाहिरात करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश दिसून येत नाही’, असेही अधिवक्ता धुमाळ यांनी न्यायालयाला सांगितले. इतकेच नव्हे, तर यापूर्वी डॉ. बालाजी तांबे यांच्या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयाने दिलेला निवाडाही अधिवक्ता धुमाळ यांनी न्यायालयात सादर केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने वरील निर्णय दिला.

सरकारच्या वतीने अधिवक्ता अरविंद राठोड यांनी बाजू मांडली. मूळ तक्रारदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अधिवक्त्या रंजना गवांदे यांनी बाजू मांडली.