परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांचे प्रकरण
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. अशा वेळी आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देऊन घटनेची पूर्ण चौकशी करण्यासाठी आग्रही रहाणे आवश्यक होते; मात्र तसे गृहमंत्र्यांनीही केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत आहेत, हे लज्जास्पद !
नवी देहली – परमबीर सिंह यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या रहात्या घरी ‘क्वारंटाईन’ होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी परमबीर सिंह यांचे पत्र खोटे असल्याचाच दावा केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचे त्यागपत्र घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही; मात्र याविषयी मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते त्यांच्या येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
(सौजन्य : ABP MAJHA)
शरद पवार पुढे म्हणाले की,
१. अनिल देशमुख ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. १५ फेब्रुवारीला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी या काळात नागपुरात रहात्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंह यांनी केलेले आरोप आणि वस्तूस्थिती यात पुष्कळ भेद आहे. अनिल देशमुख फेब्रुवारीमध्ये कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती, हे सिद्ध झाले आहे.
२. मनसुख हिरेन प्रकरणाचा आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) अतिशय योग्य दिशेने अन्वेषण करत आहे. या प्रकरणात शेवटचे धागेदोरे ए.टी.एस्.च्या हाती लागले आहेत आणि निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. त्याच वेळी अन्वेषणावरून लक्ष विचलीत करण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्र लिहून खोटे आरोप केले आहेत, असा दावा पवार यांनी केला.
३. परमबीर सिंह यांना वसुलीचे लक्ष्य दिले होते मग ते महिनाभर गप्प का बसले होते ? त्यांचे स्थानांतर झाल्यावरच ते का बोलले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.