विद्यार्थ्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा न करण्याची अन् हिंदु धर्माचे पालन न करण्याची दिली शपथ !

  • तेलंगाणामधील सरकारी संस्थेचे सचिव आणि आयपीएस् अधिकारी प्रवीण कुमार यांचा हिंदुद्वेष !

  •  गौतम बुद्धांच्या सिद्धांतावर चालण्याची शपथ !

  • सरकारी समितीच्या सचिवपदी असलेल्या आयपीएस् अधिकार्‍याने विद्यार्थ्यांना अशी शपथ देणे; म्हणजे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारकडून सरकारीयंत्रणांचा वापर करून चालवण्यात आलेला हा हिंदुविरोधी उपक्रम आहे’, असेच म्हणावे लागेल !
  • ‘प्रशासन घटनाविरोधी विचारसरणीच्या लोकांच्या हातात आहे’, असे म्हणणार्‍या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना सरकारी अधिकार्‍यांकडून हिंदु धर्मावर असे आघात होणे चालते का ?
  • अशा हिंदुद्वेषी आयपीएस् अधिकार्‍याने त्याच्या कार्यकाळात पीडित हिंदूंच्या तक्रारी कशा प्रकारे हाताळल्या असतील, याचा विचारही न केलेला बरा ! या अधिकार्‍याने आतापर्यंत हाताळलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी कुणी केल्यास, ते चुकीचे ठरणार नाही !
आयपीएस अधिकारी आर्.एस्. प्रवीण कुमार

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आर्.एस्. प्रवीण कुमार यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात ते हिंदु विद्यार्थ्यांना ‘मी राम, कृष्ण यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. भविष्यात हिंदु धर्म आणि परंपरा यांचे पालन करणार नाही’ अशी शपथ देतांना दिसत आहेत. प्रवीण कुमार राज्य सरकारच्या ‘तेलंगाणा सोशल वेल्फअर रेसीडेंशियल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन सोसायटी’चे सचिवही आहेत. (हिंदु विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शपथ देण्याचे धाडस होतेच कसे ? तेलंगाणा सरकार अन्य धर्मियांना अशी शपथ देण्याचे कधीतरी धाडस दाखवू शकतील का ? – संपादक) हा शपथ देण्याचा कार्यक्रम ‘स्वारो पवित्र मास’च्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

१. प्रवीण कुमार शपथ देतांना विद्यार्थ्यांना सांगत आहेत की, मी गौरी, गणपति आणि कुठल्याही हिंदूंचा देवतेवर विश्‍वास ठेवणार नाही. मी राम, कृष्ण यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. मी कधीही त्यांची पूजा करणार नाही. मी त्यांना भगवंताचा अवतार मानणार नाही. मी श्राद्धविधी आणि पिंडदान करणार नाही. गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गाच्या आणि सिद्धांतांच्या विरोधात असेल, अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही.

२. वर्ष २०१४ मध्ये तेलंगाणा सरकारने गरजवंत आणि वंचित मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ‘तेलंगाणा सोशल वेल्फेअर रेसीडेंशियल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन सोसायटी’ची स्थापना केली होती. प्रवीण कुमार याचे सचिव आहेत.