पणजी, १७ मार्च (वार्ता.) गोवा राज्यात आणि देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळण बंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारली आहे.
ते म्हणाले, ‘‘जनता कर्फ्यू लागू करण्याची आवश्यकता नाही. येथील परिस्थितीविषयी शासन काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊ. पंतप्रधानांनी विविध राज्यांना छोटी प्रतिबंधक क्षेत्रे करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. पर्यटकांनी सतर्कता बाळगतांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.’’ त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘जर आम्ही महामारी वेळीच रोखली नाही, तर पुन्हा ती देशभरात पसरेल. कोरोनाची दुसरी लाट आपण त्वरित थांबवली पाहिजे. यासाठी विचार करून निर्णय घ्यायला हवा.’’ यासाठी पंतप्रधानांनी राज्यांत लहान प्रतिबंधक क्षेत्रे निर्माण करून तेथे काही बंधने घालावीत, अशी सूचना केली आहे.