आद्य गोरक्षक श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनाचा पुढाकार मागण्या मान्य न झाल्यास सहस्रोंच्या संख्येने आंदोलनाची चेतावणी
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही काटेकोरपणे व्हावी आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान पदमोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु राज्यात उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा पदमोर्चा स्थगित करत प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन मोजक्या संख्येत १२ मार्च २०२१ या दिवशी आझाद मैदान, मुंबई येथे गोरक्षकांचे धरणे आंदोलन ‘आद्य गोरक्षक श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलना’च्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच ‘पुढील ३ मासांत शासन-प्रशासन यांच्याकडून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा राज्यभरातून सहस्रोंच्या संख्येने आझाद मैदान येथे आंदोलन घेतले जाईल’, अशी चेतावणी सरकारला देण्यात आली.
धरणे आंदोलनाच्या वेळी गोरक्षक संजय शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आद्य गोरक्षक श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अनेक जिल्ह्यात आमचा प्रवास झाला. ‘गोहत्या आणि लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ करण्याचे कार्य आज संपूर्ण हिंदु समाजाच्या हिताचेच नव्हे, तर मानवजातीच्या कल्याणाचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोवंशियांची हत्या चालू आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची १०० टक्के प्रभावी कार्यवाही करावी, तसेच महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’चा कायदा करावा, यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.’’