अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची नागपूर येथे मोहन भागवत यांच्याशी चर्चा

नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ११ मार्च या दिवशी सकाळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. या वेळी त्या दोघांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद दारामागे १ घंटा चर्चा केली. चर्चेचा विषय अद्याप अस्पष्ट असला, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तिघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारवर केलेल्या आरोपांमुळे सरकार अडचणीत सापडलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर भाषण करतांना सरकार ३ मासांत कोसळणार किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, या संदर्भातील वक्तव्य केले होते. या दोन्ही वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस आणि पाटील यांनी मोहन भागवत यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर उभ्या स्कॉर्पिओ वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याच्या सूत्रांवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे सरकारच्या कारभारावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काही आमदार अप्रसन्न असल्याची चर्चा आहे.