‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण

हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी !

मुळात कोणत्याही संघटनेला अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

‘फ्रीडम हाऊस’ या संस्थेच्या संकेतस्थळावरील विकृत नकाशा

मुंबई – जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्‍या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे. त्यात भारताच्या नकाशात काश्मीर प्रदेश आणि अक्साई चीन हे भूभाग भारतात दाखवले नाहीत, तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्विप ही बेटे दाखवलेलीच नाहीत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तरीदेखील ‘फ्रीडम हाऊस’ने काश्मीरला ‘पाकिस्तानी काश्मीर’ असे संबोधले आहे, तर अक्साई चीन हा भूभाग चीनच्या नकाशामध्ये दाखवला आहे. हे भारताच्या नकाशाचे विकृतीकरणच असून हा भारताचा अपमान आहे.

हिंदु जनजागृती समिती या संस्थेचा जाहीर निषेध करते. या प्रकरणी भारत सरकारने या संस्थेशी पत्रव्यवहार करून त्यांना चुकीचा भारताचा नकाशा काढून आणि योग्य नकाशा प्रकाशित करण्याविषयी सूचित करावे; अन्यथा भारत सरकारने या संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

१. समितीने याविषयी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, तसेच भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने प्रकाशित केलेला भारताचा नकाशा हाच प्रमाण मानून त्याचा उपयोग सर्वत्र करायला हवा. भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्यास भारतीय फौजदारी दंड संहितेच्या (सुधारित) १९६१ च्या कलम २(१) नुसार हा दंडनीय अपराध आहे.

२. ‘फ्रीडम हाऊस’ने भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केल्याने भारताची मानहानी झाली असून समस्त देशप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की, भारत सरकारने ‘फ्रीडम हाऊस’वर या संस्थेला हा नकाशा त्वरित हटवण्यासाठी आणि योग्य नकाशा प्रकाशित करण्यासाठी पत्रव्यवहार करावा. या संस्थेला भारत सरकारची जाहीर क्षमायाचना करण्यास सांगावे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.

३. हिंदु जनजागृती समितीकडून ‘फ्रीडम हाऊस’ या संस्थेचा निषेध करणारी आणि भारताच्या नकाशाचे विकृतीकरण रोखण्यासाठी ‘ऑनलाइन कॅम्पेन’ राबवणार असल्याचेही समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

भारताच्या नकाशाचे विकृतीकरण केलेली संकेतस्थळाची लिंक

https://freedomhouse.org/explore-the-map?type=fiw&year=2021&country=IND