मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ‘श्रीराम मंदिराच्या निधीविषयी बोलतांना मंदिरासाठी समाजातून बळजोरीने निधी गोळा केला जात आहे’, अशी मुक्ताफळे सभागृहात उधळली. याला भाजपच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेऊन विरोध दर्शवला. या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रीराम मंदिरावर सभागृहात चर्चा करावी, त्याला आमची कोणतीही अडचण नाही. जे खंडणी गोळा करतात, त्यांना ‘समर्पित निधी गोळा’ करण्याचे महत्त्व काय कळणार ?
या वेळी भाजपच्या आमदारांनी ‘जय श्रीराम’, ‘रामलल्ला मंदिर वही बनायेंगे’ अशा दिलेल्या घोषणांमुळे सभागृह दणाणून गेले. विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन जोरदार घोषणा दिल्याने विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले.