सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेचा पेपर फुटला !

पुणे – सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या दोघांना सैन्याच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे. अली अख्तर आणि महेंद्र सोनवणे अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांसह त्यांचा साथीदार आझाद खान यास पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी गणेश साळुंके यांनी तक्रार नोंदवली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (सैन्याच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकाही फुटत असतील, तर भ्रष्टाचार किती खोलवर मुरला आहे, हे लक्षात येते. पेपर फोडणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई केल्यासच इतरांना जरब बसेल. – संपादक)

२८ फेब्रुवारी या दिवशी सैन्यातील ‘रिलेशन आर्मी’ या प्रकारातील भरती चालू होती. यासाठी घेण्यात येणार्‍या समान प्रवेश परीक्षेचे पेपर आधीच उमेदवारांना पोचवणार असल्याची वार्ता सैन्याच्या गुप्तचर विभागाला मिळाली. ही माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला दिली. त्यानुसार गुन्हे शाखेने संशयितांना कह्यात घेतले. अधिक चौकशी केली असता पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागांतील तरुणांना प्रश्‍नपत्रिका देऊ असे, सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याची कबुलीही त्यांनी या वेळी दिली.

भरती प्रक्रियेतील पारदर्शकता कायम रहावी, यासाठी परीक्षा रहित केली असून भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचेही वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.