वीजदेयक वसुलीसाठी कृषी पंपांची वीज तोडली

पारनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी गाठले वीज आस्थापनाचे कार्यालय

नगर – कृषी पंपाची वीजदेयक वसुलीसाठी महावितरण आस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पारनेर तालुक्यातील (जि. नगर) भाळवणी, ढवळपुरी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला; मात्र या कारवाईने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज आस्थापनाच्या कार्यालयात येऊन तक्रार केली. तेथे चर्चा करून तोडगा काढला. महाविकास आघाडीतील पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या साहाय्याने हे आंदोलन करण्यात आले.

महावितरण आस्थापनाचे अधिकारी वसुलीसाठी दबाव आणत आहेत, अशी तक्रार शेतकर्‍यांकडून होत आहे. उद्योजक सुरेश धुरपते यांनी वीज अधिकार्‍यांना धारेवर धरत आधी वीजदेयके द्या; मगच वीज पंपाच्या अश्‍वशक्तीप्रमाणे देयकाची वसुली करावी, शेतकर्‍यांसाठी असणारी कृषी संजीवनी योजना समजावून सांगून त्याप्रमाणे वसुलीची कार्यवाही करावी, अशी मागणी केली. शेतकर्‍यांनी प्रतिअश्‍वशक्ती क्षमतेच्या पंपासाठी १ सहस्र रुपये तातडीने भरावेत, असा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे वीजजोडणी आणि वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे.