बुलढाणा – जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या गावात १५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गावात ७ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे गावकर्यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमांतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमांना गावकर्यांसहित बाहेरगावाहून काही मंडळी सहभागी झाली होती; मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्याने गावात संसर्ग पसरला. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात आरोग्य पथक, महसूल आणि पोलीस खात्यातील कर्मचारी गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करत आहेत. गावाची लोकसंख्या २ सहस्राच्या जवळपास आहे. त्यामुळे आता अजून किती जणांचे कोरोनाचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.