कार्डिनल रॉबर्ट साराह हे ख्रिस्त्यांचे पुराणमतवादी धर्मगुरु म्हणून ओळखले जातात. कडव्या ख्रिस्त्यांमध्ये कार्डिनल साराह फार लोकप्रिय होते. एवढेच कशाला, पोप फ्रान्सिस यांच्यानंतर ‘भावी पोप’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ‘माजी पोप’ असलेले पोप बेनिडिक्ट यांचेही ते लाडके होते; मात्र पोप फ्रान्सिस यांनी त्यांना तडकाफडकी पदमुक्त केले. ‘जगाला दाखवण्यासाठी कार्डिनल साराह यांनी त्यागपत्र दिले आणि ते पोप यांनी मान्य केले’, असे चर्चकडून भासवण्यात येत असले, तरी ही कार्डिनल साराह यांची हकालपट्टीच होती. व्हॅटिकन चर्चमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेले पाद्री ७५ वर्षांचे होईपर्यंत कार्यरत राहू शकतात. तेथे असलेल्या कुठल्याही पाद्य्राने पंचाहत्तरी गाठल्यानंतर त्याला त्यागपत्र द्यावे लागते. असे असले, तरी पोप बहुतांश पाद्य्रांची त्यागपत्रे रहित करून त्यांना कार्यरत रहाण्याची अनुमती देतात. त्यामुळे त्यागपत्र हा तसा सोपस्कर असतो; मात्र कार्डिनल साराह यांच्या संदर्भात असे काही झाले नाही. त्यांनी जून २०२० मध्ये त्यागपत्र दिले होते आणि पोप यांनी ते फेब्रुवारी २०२१ मध्ये स्वीकारून त्यांना पदमुक्त केले. या हकालपट्टीच्या प्रकरणामुळे व्हॅटिकन चर्चमधील पोप विरुद्ध कार्डिनल हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पांढरे झगे परिधान केलेले हे ‘प्रेम आणि शांती यांचे पुजारी’ जगाला सौहार्दतेचे आणि शांतीचे तत्त्वज्ञान सांगत असतात; मात्र हीच सौहार्दता त्यांच्यात दिसून येत नाही. आता ख्रिस्त्यांनी व्हॅटिकनमध्ये बसून काय गोंधळ घालावा ? हा त्यांचा प्रश्न. ज्या ख्रिस्त्यांना त्यांचे अंतर्गत प्रश्न सौहार्दतेने आणि शांततेत सोडवता येत नाहीत, त्यांनी हिंदूंना प्रेम, शांती आणि सौहार्दता शिकवू नये. ख्रिस्ती पंथाला आध्यात्मिकतेचा, साधनेचा पाया नसल्यामुळे त्याचे ‘मोठे घर, पोकळ वासे’, अशी स्थिती झाली आहे.
पोप विरुद्ध कार्डिनल !
पोप फ्रान्सिस यांना ख्रिस्त्यांमध्ये चर्चविषयी वाढत चाललेली उदासीनता सतावत आहे. त्यामुळे त्यांनी व्हॅटिकन चर्चने आधुनिक विचारांचा अंगीकार करावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. बायबल समलैंगिक विवाहाला अनुमती देत नाही; मात्र ‘त्याविषयी चर्चने सौम्य भूमिका घ्यावी’, असे पोप फ्रान्सिस यांना वाटते. यासह गर्भपात, महिला स्वातंत्र्य आदी अशी सूत्रे आहेत, ज्याविषयी पोप फ्रान्सिस नमते घेऊ इच्छितात. असे केल्याने जगभरात ज्या ख्रिस्त्यांनी चर्चकडे पाठ फिरवली आहे, ते पुन्हा चर्चकडे आकर्षित होतील, असे त्यांना वाटते. याउलट कार्डिनल साराह यांची मते आहेत. ‘समलैंगिक विवाहाला आणि गर्भपाताला मान्यता म्हणजे एकप्रकारे नाझी विचारसरणीला मान्यता देण्यासारखे आहे’, असे त्यांचे मत आहे. अलीकडच्या काळात जगभरातील वासनांध पाद्य्रांची पापे बाहेर येत आहेत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम पोप फ्रान्सिस करत आहेत, तर ‘पाद्य्रांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे’, असे कार्डिनल साराह यांचे ठाम मत आहे. या दोघांमध्ये सर्वांत मोठा खटका उडाला, तो मुसलमान शरणार्थींच्या संदर्भात. ‘युरोपीय देशांनी शरणार्थींचे स्वागत करावे’, असे पोप फ्रान्सिस यांना वाटत होते, तर ‘युरोपीय देशांनी मुसलमान शरणार्थींना आश्रय दिल्यास, संपूर्ण जगात इस्लामची आक्रमणे चालू होतील’, असे कार्डिनल साराह यांचे मत होते. कार्डिनल साराह यांनी त्यांची ही मते चर्चच्या चार भिंतींच्या आड राहून मांडली असती, तर ठीक होते; मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती देतांना किंवा सार्वजनिक ठिकाणी परखडपणे स्वतःची मते मांडली. त्यामुळे ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु आणि भविष्यात होऊ घातलेले सर्वोच्च धर्मगुरु यांच्यातील वैचारिक दरी जगासमोर आली. पोप फ्रान्सिस यांना पुरोगामीत्वाची झूल पांघरून ख्रिस्ती पंथ वाचवायचा आहे, तर कार्डिनल साराह यांना पुराणमतवादी विचार अंगीकारून ख्रिस्ती पंथाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. येथे कोण चुकीचे किंवा कोण बरोबर, यात आम्हाला पडायचे नाही किंवा कार्डिनल साराह यांच्याविषयी हिंदूंनी सहानुभूती दाखवण्याचीही आवश्यकता नाही; कारण ख्रिस्त्यांच्या सर्वोच्च धर्मगुरुपदी कुणीही विराजमान झाले, तरी भारताचे ख्रिस्तीकरण करणे, हे त्यांचे लक्ष्य असते. असो. येथे महत्त्वाचे म्हणजे पाद्य्रांमधील वाद मिटवण्यासाठी कुणी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही. यातून त्यांची वैचारिक अपरिपक्वताही दिसून आली.
ख्रिस्ती पंथाची धर्मचिकित्सा हवी !
एखाद्या सराईत राजकारण्याप्रमाणे पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनल साराह यांचा ‘काटा’ काढला. अशी घटना हिंदूंच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेले शंकराचार्य किंवा अन्य धर्मगुरु यांच्या संदर्भात घडली असती, तर प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले असते. ‘हिंदूंचे भांडकुदळ धर्मगुरु’, ‘असे धर्मगुरु लोकांना काय शिकवण देणार’ अशा प्रकारची वृत्ते प्रसारित करून ‘हे धर्मगुरु किती वाईट आहेत’, असे चित्र रंगवले गेले असते; मात्र पोप फ्रान्सिस यांना अशा प्रकारे टीकेचे धनी व्हावे लागले नाही. या पूर्ण वादाच्या प्रकरणात ना चर्चने स्पष्टीकरण दिले ना प्रसारमाध्यमांनी किंवा सुधारणावाद्यांनी त्यांना स्पष्टीकरण देण्यास बाध्य केले. सध्या पुरोगाम्यांमध्ये ‘धर्मचिकित्सा’ हा शब्द फार रूढ आहे. हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी कुठल्याही चर्चासत्रामध्ये ‘हिंदु धर्माची चिकित्सा व्हायला हवी’, अशी मागणी या टोळीकडून केली जाते. दुसरीकडे जगभरात वासनांध पाद्य्रांच्या वाढत्या कारवाया, आमिषे दाखवून धर्मांतर, चर्चमधील वाढता अनाचार आदी सूत्रे पहाता ‘ख्रिस्ती पंथाची चिकित्सा करा’, अशी मागणी कुणी करतांना का दिसत नाही ? असे केले, तर स्त्रीला उपभोग्य वस्तू समजून तिच्यावर अत्याचार करण्याची किंवा इन्क्विझीशन करण्याची ‘प्रेरणा’ ख्रिस्त्यांना कुठून मिळाली, हे जगासमोर येईल !
व्हॅटिकन चर्चला ख्रिस्ती पंथ वाढवायचा आहे; मात्र त्यासाठी अवलंबलेला मार्ग त्याला विनाशाच्या खाईत लोटणारा आहे. एखादे नाणे खणखणीत असेल, तर खोटेपणा किंवा अनाचार यांचा आधार घ्यावा लागत नाही, हे या पाद्य्रांना कोण सांगणार ? जगभरातील पाद्य्रांच्या कुकर्मामुळे व्हॅटिकन चर्चची प्रतिमा आधीच मलीन झाली आहे. आता पोप विरुद्ध कार्डिनल यांच्यातील लढाईमुळे चर्चमधील अंतर्गत राजकारणही समोर आले. आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक होय !