वोकहार्ट फाऊंडशेनकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा सन्मान

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा

मुंबई – वोकहार्ट फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. या वेळी नामवंत कॉर्पोरेट संस्थांनाही सामाजिक दायित्वासाठी ‘सी.एस्.आर्. शायनिंग स्टार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि अन्य क्षेत्रांतील कार्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा सोहळा पार पडला.

रतन टाटा यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला. वैयक्तिक विशेष योगदानाविषयी डॉ. जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे आणि सुरज कुमार यांना, तर उद्योगक्षेत्रातील विशेष योगदानाविषयी कोटक महिंद्रा बँक यांना सन्मानित करण्यात आले. पशूकल्याण क्षेत्रातील योगदानासाठी ‘ओ.एन्.जी.सी.’, बालकल्याणसाठी वेदांता लिमिटेड, कोरोना काळातील कार्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर, अपंग घटकांसाठी हिरो मोटोकॉर्प, शैक्षणिक क्षेत्रासाठी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पर्यावरणासाठी अशोक लेलँड, आरोग्य क्षेत्रासाठी गेल (इंडिया), कौशल्य विकासासाठी लार्सन अँड टुब्रो, ट्रान्सजेंडर एम्पॉवरमेंटसाठी एस्सार, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी आयटीसी, महिला सबलीकरणासाठी ‘आर्.ई.सी.’ अशा मान्यवर संस्थांना गौरवण्यात आले.

सहस्रो हातांनी धन समाजासाठी वितरित करावे, ही आपली संस्कृती ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

१०० हातांनी धनसंचय करावा; परंतु ते धन सहस्रो हातांनी समाजासाठी वितरित करावे, ही आपली संस्कृती आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना महत्त्वाची आहे.