कोल्हापूर, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – देहली येथील ‘जे.एन्.यू.’ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याचे व्याख्यान २० फेब्रुवारीला होणार होते. या व्याख्यानामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले. याची नोंद घेत पोलीस प्रशासनाने ‘कोणत्याही परिस्थितीत व्याख्यानास अनुमती देणार नाही’, अशीच ठाम भूमिका घेतली. त्यामुळे आयोजकांना हे व्याख्यान रहित करण्यास भाग पडले.
‘डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांचे सूत्रधार मोकाट असून आमच्यासारख्या लोकशाही मार्गाने प्रबोधन करणार्यांना मात्र पोलीस अनुमती देत नाहीत’, अशी मुक्ताफळे आयोजकांनी पत्रकारांशी बोलतांना उधळली. (गेली ७ वर्षे अन्वेषण करूनही डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सीबीआय अन् विशेष तपास पथके अन्वेषण करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला अद्याप ठोस काहीच मिळालेले नाही. त्याही पुढे जाऊन डॉ. दाभोलकर-कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे दोन्ही खटले चालत नसून संशयित म्हणून अटक केलेल्या अनेक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे कारागृहात खितपत पडावे लागत आहे. यातून काहीच साध्य होत नसल्याने वैफल्यग्रस्ततेतून तथाकथित पुरो(अधो)गामी नेहमीच अशा प्रकारचे तुणतुणे वाजवतात ! – संपादक)