नवी मुंबई महापालिकेचा ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संमत

नवी मुंबई – महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेचा वर्ष २०२०-२१ चा सुधारित आणि वर्ष २०२१-२२ चा मूळ ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प संमत केला.

वर्ष २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात २ सहस्र ३६९ कोटी रुपये जमा आणि ३ सहस्र ८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पात ४ सहस्र ८२५ कोटी रुपये जमा आणि ४ सहस्र ८२२ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचाही अर्थसंकल्प संमत केला. थकित मालमत्ता कर वसुलीसाठी या वर्षी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. मार्च २०२१ अखेर ५७० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल होईल अशी अपेक्षा आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ, गटारे यांची कामे करण्यासाठी ५८८ कोटी, विविध ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी ९८ कोटी रुपये, दिवाबत्ती सुधारण्यासाठी ५८ कोटी रुपये, पामबीच मार्गावरील सिग्नलच्या कामांसाठी १४ कोटी, गावठाण आणि झोपडपट्टी क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिनी टाकणे, प्रक्रिया केंद्र बांधणे याकरिता ५० कोटी, दैनंदिन रस्ते सफाई, कचरा संकलन, वाहतूक आदींसाठी २५४ कोटी रुपये, तर वैद्यकीय सुविधांकरिता ४९९ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.