फेब्रुवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्रात १२ सहस्र १७९ बालकांचा मृत्यू

महाराष्ट्रात १२ सहस्र १७९ बालकांचा मृत्यू

मुंबई – फेब्रुवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १२ सहस्र १७९ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती ‘समर्थन’ या सामाजिक संस्थेचे समन्वयक रूपेश कीर यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. समर्थन संस्था ही मानवाधिकार आणि कुपोषण या क्षेत्रात काम करते.

या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये सर्वाधिक १ सहस्र ९७ बालकांचा मृत्यू झाला आहे. अकोला येथे ७८३, संभाजीनगर ७२९, नाशिक ६६४, नागपूर ५८७, तर पुणे येथे ५५१ बालकांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार १ ते ५ वर्षे वयोगटातील १ सहस्र ८७२ बालकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी समर्थन संस्थेने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये बालकांचा मृत्यूच्या आकडेवारीसह मृत्यूची कारणेही दिली आहेत. वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, कोरोना संक्रमण, न्यूमोनिया, श्‍वास घेण्यास त्रास या कारणांचा समावेश आहे.