लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवल्यास अशा घटना कधीही घडणार नाहीत. यासाठी पालकांनी स्वतः धर्मशिक्षण घेऊन मुलांनाही ते दिले पाहिजे. यातून चांगले संस्कार आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे अधोरेखित होते !
नागपूर – ‘फ्री फायर’ खेळ खेळण्याच्या नादात ३ अल्पवयीन मुले घर सोडून निघून गेली. या संदर्भात मुलांच्या पालकांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सी.सी.टी.व्ही. चित्रणाच्या आधारे मुलांची शोधाशोध केली असता, तिघेही मुंबईला निघाल्याचे समोर आले. आर्.पी.एफ्. पोलिसांच्या साहाय्याने या मुलांना मुंबई येथे जाण्यापासून रेल्वे स्थानकावर रोखण्यात आले. ही तिन्ही मुले येथील गोपालनगर भागात रहातात. कोरोनाच्या काळात समवेत अभ्यास करण्याचे कारण देऊन ही ३ मुले गेम खेळत होती. १३ फेब्रुवारी या दिवशी ‘पहाटे फिरायला जातो’, असे सांगून ही ३ मुले घराबाहेर पडली होती. हे तिघेही ‘फ्री फायर’ खेळाच्या नादात मुंबईला जात असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठोसरे यांनी सांगितले.
‘फ्री फायर’ खेळ काय आहे ?
‘फ्री फायर’ हा इतर व्हिडिओ ‘मोबाईल गेम’प्रमाणे एक खेळ आहे. यात ५० जण एकाच वेळी ‘ऑनलाईन’ पद्धतीने समवेत खेळू शकतात. यात सहभागी होणारा खेळाडू हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाली उतरतो. यात तो इतरांना मारून स्वतःचा बचाव करतो. शेवटी जो जिवंत राहील तो या खेळाचा विजेता असतो. आकर्षक पद्धतीने खेळाची रचना असल्याने मुले या ‘व्हर्चुअल’ जगाला भारावून जातात. अल्पवयात नको ते निर्णय घेतात. याचा दुष्परिणाम म्हणून काही मुलांनी आपला जीव गमावला आहे.