अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप
मुंबई – ‘लवासा हिलस्टेशन प्रकल्पा’च्या निर्मितीसाठी शेतकर्यांच्या भूमी कवडीमोल मूल्याने आणि अनधिकृतपणेे मिळवण्यात आल्या आहेत. तसेच प्रकल्पाला विविध शासकीय प्रशासनांनी मान्यताही दिली आहे. त्यानंतर केवळ हा प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्या आस्थापनाचा असल्याने त्याला कायदेशीर स्वरूप देण्याच्या उद्देशाने गैर अन् अवैध पद्धतीने, तसेच घाईघाईत, पूर्वलक्षी प्रभावाने कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असा आरोप अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेद्वारे केला. पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन करून आणि शेतकर्यांच्या भूमी अनधिकृत पद्धतीने विकत घेऊन ‘लवासा प्रकल्प’ उभारण्यात आला, असा आरोप करत प्रकल्पाच्या वैधतेला जाधव यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली. या खटल्याची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.