तुम्ही अब्जावधी डॉलरचे आस्थापन असाल; मात्र लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचे !

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणाचे प्रकरण

  • सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला फटकारले

नवी देहली – तुमच्या नवीन धोरणांमुळे भारतियांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक शंका उपस्थित होत आहेत. तुम्ही अब्जावधी डॉलरचे आस्थापन आहात; पण लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा अधिक महत्वाचे आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला फटकारले.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि केंद्र सरकार यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणानुसार वापरकर्ते जी माहिती अपलोड किंवा अन्य गोष्टींसाठी वापर करणार आहेत, तिचा व्हॉट्सअ‍ॅप कुठेही वापर करू शकते, कुठेही शेअर (प्रसारित) करू शकते. हे धोरण ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होते; मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर हा कालावधी वाढवून १५ मे करण्यात आला आहे.