(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार !’

‘फॉर द नेशन विथ पॉप्युलर फ्रंट’, या अभियानाला प्रारंभ

  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चांगले उमेदवार म्हणजे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे उमेदवार, हे वेगळे सांगायला नको !
  • उमेदवारांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा इतिहास माहिती करून घ्यावा. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांना आतंकवादाशी संबंध असल्याच्या सूचीत समाविष्ट केले होते. त्याचप्रमाणे लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
  • अयोध्या येथील बाबरी मशिदीची जागा ही श्रीरामाचे जन्मस्थान होते, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही तो मान्य न करता त्याविषयी मुसलमानांना ही संघटना चिथावून घालून ‘पुन्हा बाबरी उभारू’, असा प्रचार करत आहे.

मडगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या देशाच्या भल्यासाठी कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना सरकारकडून विविध कारणांखाली कह्यात घेण्याचे सत्र चालू आहे. गोव्यातही विविध विषयांवर आंदोलने चालू आहेत; मात्र शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशासाठी कार्य करणार्‍या लोकांना एकत्र आणण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) ही संघटना ‘फॉर द नेशन विथ पॉप्युलर फ्रंट’ या अभियानाला प्रारंभ करत आहे. (देशासाठी कार्य कि भारताला इस्लामी राष्ट्र करण्याच्या कार्याला ‘पी.एफ्.आय.’ अभियानाद्वारे प्रारंभ करत आहे ? – संपादक) तसेच ‘पी.एफ्.आय.’ ही संघटना गोव्यातील नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार, अशी माहिती संघटनेचे गोवा विभागप्रमुख शेख अब्दुल रौफ यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘पी.एफ्.आय.’ संघटना सध्या ‘नया कारवां, नया हिंदुस्तान’ घडवण्यासाठी कार्य करत आहे. या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील गावागावात जाऊन देशाच्या भल्यासाठी आणि सर्वांनी एकजूट टिकवून ठेवावी, यांसाठी जनजागृती करणार आहे. याविषयी लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. गोव्याच्या भल्यासाठी वावरलेल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे, तसेच ‘पी.एफ्.आय.’ संघटनेला १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यासह देशभरात रॅली, कोपरा बैठका, सार्वजनिक बैठका आदी घेण्यात येणार आहेत. घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात ‘फेसिस्ट’ राज्य कारभाराच्या विरोधात गोमंतकियांनी आवाज उठवला पाहिजे. गोव्यात अभियानाचा भाग म्हणून २१ फेब्रुवारी या दिवशी मोठे संमेलन घेण्यात येणार आहे.’’