अमेरिका चीनची आव्हाने स्वीकारणार ! – राष्ट्रपती जो बायडेन यांची स्पष्टोक्ती

जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनकडून येणारी आव्हाने अमेरिका थेट सामना करत स्वीकारील; मात्र जेव्हा देशहितामध्ये चीनसमवेत काम करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा आम्ही मागे हटणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती जो बायडेन यांनी एका कार्यक्रमात केले. चीनविषयी प्रथमच बायडेन यांनी त्यांच्या सरकारचे धोरण स्पष्टपणे मांडले.

१. बायडेन पुढे म्हणाले की, आम्ही चीनकडून होणार्‍या आर्थिक शोषणाचा सामना करू. मानवाधिकार, बौद्धीक संपदा आणि जागतिक शासन यांवर चीनकडून होणारी आक्रमणे अल्प करण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२. बायडेन म्हणाले की, अमेरिकेच्या नेतृत्वाला प्रथम त्याच्या समोरील आव्हाने समजून घ्यावी लागतील. यात चीनची वाढती महत्त्वाकांक्षा आणि लोकशाहीला हानी पोचवणे, तसेच रशियाकडून त्याला बाधा निर्माण करणे, यांचा समावेश आहे. आम्हाला आमची उद्दीष्टे गाठली पाहिजेत. महामारीपासून ग्लोबल वॉर्मिंग, अण्वस्त्र प्रसार आणि जागतिक आव्हाने यांचा सामना करावा लागणार आहे.

३. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले की, आमची प्राथमिकता ‘चीनकडून होणारे आर्थिक शोषण रोखणे’, ही आहे. यामुळे अमेरिकेतील नोकर्‍या आणि कर्मचारी यांच्यावर परिणाम होत आहे.