अंबिवली (जिल्हा ठाणे) येथे आरोपीला घेऊन जाणार्‍या पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण : ३ पोलीस घायाळ

  • इराण्यांकडून आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका !

  • पोलिसांच्या दोनपैकी एका गाडीतील पोलीस पळून गेले !

  • यापूर्वीही इराण्यांकडून पोलिसांवर ८ – ९ वेळा आक्रमण !

  • आक्रमणकर्त्यांसमोर नांग्या टाकून पळून जाणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करू शकतील का ? अशा प्रकारे मार खावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
  • आक्रमणकर्त्यांचा सामना करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?
  • अशा उपद्रवी विदेशी गुंडांना सरकार देशातून हाकलून का देत नाही ?
  • हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर नांग्या टाकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध !
  • धर्मांधांची मुजोरी जाणा !
अंबिवली येथे पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण

ठाणे, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – अंबिवली रेल्वेस्थानकाच्या शेजारी इराणी टोळीची वस्ती आहे. या वस्तीत अनेक गुन्हेगार आश्रय घेत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या धाडीत उघड झाले आहे. एका इराणी आरोपीला पकडण्यासाठी मीरा-भाईंदर पोलिसांचे पथक गेले होते. आरोपीला कह्यात घेऊन हे पथक येत असतांनाच इराणी जमावाने पोलिसांवर आक्रमण करून आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडवले. (याचा अर्थ इराणींनी दगड गोळा करूनच ठेवले होते ! – संपादक) या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. विशेष म्हणजे इराणी वस्तीत आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवर यापूर्वी ८ – ९ वेळा आक्रमण झाले आहे. (यापूर्वी घडलेल्या घटनांतून पोलीस आणि प्रशासन यांनी काही बोध का घेतला नाही ? – संपादक)

१. मीरा-भाईंदर पोलिसांचे पथक आरोपीला कह्यात घेऊन गाडीतून येत होते. समवेत पोलिसांची आणखी एक गाडी होती.

२. अंबिवली रेल्वे स्थानकाजवळ असलेले रेल्वेचे फाटक बंद असल्याने पोलिसांच्या दोन्ही गाड्या फाटकाजवळ अडकल्या.

३. हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुण यांनी पोलिसांच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक चालू केली, तर काही जणांनी बांबूच्या साहाय्याने पोलिसांच्या गाड्यांवर आक्रमण केले. (इराणींवर जरब बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही ! – संपादक)

४. अचानक झालेल्या या आक्रमणामुळे पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांच्या २ गाड्यांपैकी १ गाडी तिथून दुसर्‍या मार्गाने निघून गेली. (गुंडांचे आक्रमण झाल्यावर स्वतःच्या सहकार्‍यांना वार्‍यावर सोडणारे पोलीस ! असे पोलीस कधी गुंडांपासून जनतेला वाचवतील का ? सरकारने अशा पळपुट्या पोलिसांना सेवामुक्तच केले पाहिजे ! – संपादक)

५. पोलिसांच्या ज्या गाडीतून या आरोपीला नेण्यात येत होते, नेमकी तीच गाडी आक्रमणकर्ते इराणी जमावाच्या तावडीत सापडली. इराण्यांनी त्या सराईत आरोपीला पोलिसांच्या तावडीतून खेचून बाहेर काढले आणि त्याला घेऊन तेथून पसार झाले. (इराणी वस्तीतील ही दहशत पोलीस विभाग आणखी किती काळ सहन करणार ? – संपादक)

६. या प्रकरणी कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात आक्रमण करणार्‍या इराणी जमावाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (पोलिसांनी मोठी कुमक घेऊन दोषींना घराघरांतून बाहेर काढून अटक केली पाहिजे ! – संपादक)

७. घायाळ झालेल्या पोलिसांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.