यवतमाळ, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालय येथील सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश एम्.ए. मोहिउद्दीन हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जितेंद्र बारडकर, प्रमुख वक्ते म्हणून अमोलकचंद महाविद्यालयाचे प्रा. के. वाय. बुटले उपस्थित होते.
या वेळी बुटले यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगतांना मराठी भाषा ही साहित्यामुळे अधिकच संपन्न झाली असल्याचे सांगितले. एम्. मोहिउद्दीन यांनी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व खासगी संस्था यांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने प्रतिवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असतो, याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.