मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप, महिला मोर्चा

पोलीस ठाण्यात भेट घेण्यासाठी उपस्थित १ अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे

मिरज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – मिरज येथे १३ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेली बलात्काराची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या जबाबानुसार कसून अन्वेषण करून या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केली. अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी मिरज येथे पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबाला आधार दिला. त्यानंतर त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची भेट घेऊन वरील मागणी केली.

Posted by Adv Swati Shinde on Sunday, January 31, 2021

या संदर्भात अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या, ‘‘मुलगी शाळेत जात असतांना तिला धमकावून खोलीत नेऊन गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना धक्कादायक आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून इतर आरोपींना अटक झालेली नाही. घटनेच्या ठिकाण गाडी, तसेच संशयितास साहाय्य करणारे अन्य लोक यांचे पूर्ण अन्वेषण व्हावे.’’ या वेळी सौ. उर्मिला बेलवलकर, वैशाली पाटील, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, लतिका शिंगणे, ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्री. अमर पडळकर, श्री. गजानन मोरे, श्री. शिवरुद्र कुंभार यांसह अन्य उपस्थित होते.