मुंबई येथील सनातनचे साधक वैद्य उदय धुरी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे आलेल्या अनुभूती

वैद्य उदय धुरी

१. ‘न्यूमोनिया’ आजाराचा ठिपका आढळून येणे आणि कोविड चाचणीचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ येणे

‘२८.६.२०२० या दिवशी मला हिवताप झाल्याचे निदान झाले. त्यानंतर १७ दिवस मी घरी थांबलो. काही दिवसांनी थंडी वाजून पुन्हा ताप आला. लगेचच मी स्वतःला विलग करून घेतले. मला रक्तदाब, मधुमेह, ‘हायपोथायरॉईड’ आणि हृदयाची धडधड होणे, असे विविध आजार आहेत. तीन दिवस मला तापही येत होता. चौथ्या दिवशी क्ष-किरण पडताळणी केली असता अहवालात ‘न्यूमोनिआ’ आजाराचा ठिपका आढळून आला. त्यानंतर केलेल्या कोविड चाचणीचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आला. तेव्हा मी चाकरी करत असलेल्या कोपरखैराणे येथील माथाडी रुग्णालयात भरती झालो.

२. चाचण्यांचा अहवाल अपेक्षित असा नसल्याने दुसर्‍या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पुन्हा ‘प्लेटलेट्स’ची चाचणी करण्याचे ठरवणे

रुग्णालयाच्या विश्‍वस्तांनी दुसर्‍या दिवशी ‘डी डायमर’ म्हणजे ‘शरिरात सूज पसरत असल्याचे दर्शवणारी चाचणी आणि रक्तप्रवाहात काही अडथळा नाही ना ?’, याविषयीची पडताळणी करण्यास सांगितले. ‘डी डायमर’ चाचणीच्या अहवालाचे परीक्षण १० सहस्र आले होते. (सामान्य परीक्षण ५०० असावे लागते.) रक्तामधील ‘प्लेटलेटस्’ची संख्या ३१ सहस्र होती. सामान्य संख्या १ लक्ष ५० सहस्र असावी लागते. अशा परिस्थितीत खरेतर माझे नाक, हिरड्या आणि थुंकी यांतून रक्तस्राव दिसायला हवा होता; मात्र तसे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. अशक्तपणा किंवा थकवाही नव्हता. लक्षणे नसल्याने रक्त पातळ करण्याचे इंजेक्शनही देता येत नव्हते. परीक्षण ‘निगेटिव्ह’ आल्याने आणि मला मधुमेह अन् रक्तदाबाचाही त्रास असल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया झपाट्याने होणार होती. त्यामुळे मला हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता होती. पुढील उपचारासाठी ‘प्लेटलेट्स’ची संख्या सामान्य येण्याची आवश्यकता असल्याने रुग्णालयाचे विश्‍वस्त आणि आधुनिक वैद्य यांनी तातडीने दुसर्‍या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ‘प्लेटलेट्स’ पुन्हा पडताळण्याचे ठरवले.

३. संतांचे आश्‍वासक वचन ऐकून भावजागृती होणे

त्या दिवशी मी रात्री भ्रमणभाष करून पुन्हा करायच्या चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्‍वस्त केले. संतांचे आश्‍वासक वचन ऐकून माझी भावजागृती झाली.

४. रुग्णालयात असतांना नामजप करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक अवयवाला चैतन्य दिल्याने सकाळी उठल्यावर उत्साही वाटणे

मी भावपूर्ण नामजप करू लागल्यावर माझे मन स्थिर झाले. ‘मी मनाने रामनाथी आश्रमातील एका कक्षात पोचलो. तेथे परात्पर गुरु डॉक्टर (सूक्ष्मातून) जणूकाही माझी वाटच पहात होते. त्यांनी स्मितहास्य करताच मला अश्रू अनावर झाले. मी साष्टांग नमस्कार घालून गुरुदेवांना शरण गेलो. ‘त्याच क्षणी परात्पर गुरुदेवांच्या चरणस्पर्शाने माझी शुद्ध हरपली’, असे मला दिसले. मी निपचित पडून होतो. गुरुमाऊलीने वेगवेगळ्या पद्धतींनी मला चैतन्य दिले. त्यानंतर ‘कोणताही आधार नसतांना मी हवेत वर उचलला गेलो’, असे मला दिसले. परात्पर गुरुदेवांनी माझ्या प्रत्येक अवयवाला चैतन्य प्रदान केले. त्या उपायांमुळे माझ्या देहात ओतप्रोत चैतन्यशक्ती भरली जात होती. ‘हे सर्व मी तटस्थ राहून पहातांना माझा ‘निर्गुण’ नामजप आपोआप चालू झाला आहे आणि तो थांबतच नाही’, अशी अनुभूती मला आली. हे सर्व चालू असतांना मला झोप लागली. मला निद्रानाशाचा त्रास आहे; मात्र त्या रात्री मला गाढ झोप लागली. सकाळी उठल्यावर मला उत्साह वाटत होता आणि भावपूर्ण नामजप होत होता.

५. पुन्हा केलेल्या चाचणीचा अहवाल पालटणे

अन्य एका रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत दिलेल्या ‘प्लेटलेट्स’चे परीक्षण प्राप्त झाले. ते ३१ सहस्रांवरून १ लक्ष ७५ सहस्र, म्हणजेच सामान्य झाले होते. काही वेळाने सद्गुरु (कु.) अनुराधाताई यांनी भ्रमणभाष करून माझा त्रासही पुष्कळ उणावल्याचे सांगितले. ‘परात्पर गुरुदेवांनी एक रात्र चैतन्यदायी उपाय करून या भीषण चक्रातून मला बाहेर काढले’, अशी माझी श्रद्धा आहे. त्यानंतर रुग्णालयाच्या विश्‍वस्तांनी मला नवी मुंबईतील एका अद्ययावत रुग्णालयात भरती केले. तिथे माझ्या रक्ताच्या ‘डी डायमर’ आणि प्लेटलेटस् चाचण्या, तसेच छातीची क्ष-किरण चाचणी करण्यात आली. त्यांचे परीक्षण खालीलप्रमाणे होते.

अ. क्ष-किरण चाचणीच्या अहवालात न्यूमोनियाचा ठिपका आढळला नाही.

आ. ‘डी डायमर’ २० पटींनी वाढला होता.

इ. ‘प्लेटलेट्स’ची संख्याही सामान्य झाली होती.

केवळ एका रात्रीच्या उपायांनंतर सर्वच चाचण्यांच्या अहवालात आश्‍चर्यकारक पालट झाले होते. त्यामुळे रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना रक्त पातळ करणारे इंजेक्शन देतांना कोणतीही अडचण आली नाही.

जगद्गुरु श्रीकृष्णस्वरूप, श्रीमन्ननारायणस्वरूप, जन्म-मृत्यूच्या चक्रातून सोडवणारे, याच जन्मात पुनर्जन्म देणारे आणि संजीवनी विद्या शिकवणारे परात्पर गुरुदेव, तुमच्या पावन चरणी शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त करतो.’

– वैद्य उदय धुरी, मुंबई (२५.७.२०२०)

कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त साधक-रुग्णांचा आधारस्तंभ बनलेले आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अनन्य श्रद्धा असलेले मुंबई येथील वैद्य उदय धुरी !

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

१. कोरोनाग्रस्त साधकांना आधार देणेे

१ अ. साधकांना उपचारांची नेमकी दिशा देऊन त्यांना साहाय्य करणे : ‘कोरोनाचेे जगभर थैमान चालू असतांना मुंबईतही उच्चांकी संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळू लागले. या नव्या रोगाचे लोण एवढ्या झपाट्याने पसरत होते. सनातनच्या मुंबईतील काही साधकांनाही ‘कोरोना’ची लागण झाली. त्या वेळी साधकांना आधार देण्यासाठी आणि त्यांना उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी धावून आले मुंबईतील वैद्य उदय धुरी ! मुंबई, ठाणे आणि रायगड येथील कोरोनाग्रस्त साधक वैद्य उदय धुरी यांना सातत्याने संपर्क करायचे. त्या सर्वांना ते संयमाने मार्गदर्शन करायचे. त्यांच्या बोलण्यातून साधकांना दिशा मिळायची आणि कोरोनापासून मुक्त होण्यासाठी मानसिक बळही मिळायचे.

१ आ. उपचारांविषयी चांगल्या प्रकारे समन्वय ठेवणे : वैद्य उदय धुरी साधक-रुग्णांना साहाय्य करायचेच, त्याचबरोबर साधक उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, तसेच साधकांचे कुटुंबीय यांच्याशीही चांगल्या प्रकारे समन्वय ठेवायचे. आधुनिक वैद्यांशी संपर्क साधून ते साधकांवर होत असलेल्या उपचारांविषयी जाणून घ्यायचे.

प्रेमभाव, तळमळ, इतरांचा विचार आणि इतरांना साहाय्य करणे आदी गुणांमुळे रात्री-अपरात्रीही ते साधकांना साहाय्य करायचे. या सर्व गुणांमुळे ते साधकांचा आधारस्तंभ बनले.

२. कोरानाग्रस्त झाल्यावर गुरुकृपेची अनुभूती घेणारे वैद्य उदय धुरी !

साधकांना साहाय्य करत असतांना त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाला सामोरे जावे लागले. या प्रसंगालाही ते धैर्याने सामोरे गेले. गुरुदेवांवर असलेल्या अतूट श्रद्धेमुळे ते कोरोनाशी लढू शकले. या कालावधीत त्यांना पुष्कळ अनुभूती आल्या. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनी चैतन्यदायी उपाय केल्याची त्यांना आलेली अनुभूती आणि नंतर केलेल्या सर्वच चाचण्यांच्या अहवालात झालेले आश्‍चर्यकारक पालट हे सर्व बुद्धीअगम्य असून खूपच अद्भूत आहे.

३. आपत्काळात ‘भावपूर्ण साधना’ हाच आधार !

आपत्काळात ‘भावपूर्ण साधना’ हाच साधकांचा आधार आहे. वैद्य उदय धुरी यांनी निरपेक्षपणे आणि स्थिर राहून सेवा केल्याने अन् परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेल्या त्यांच्या भावामुळे त्यांना अनेक अनुभूती आल्या. या अनुभूतींतून ‘भगवंत (परात्पर गुरु डॉक्टर) त्याच्या भक्तांचे कसे रक्षण करतो’, हे लक्षात येते.

कोरोनाच्या निमित्ताने भगवंताने सर्वांना आपत्काळाची एक झलक दाखवली आणि ‘त्यातून कसे तरून जायचे ?’, हेही शिकवले. येणारा आपत्काळ आणखी भयावह असणार आहे. अशा काळात ‘स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धैर्याने इतरांना साहाय्य कसे करायचे ?’, याचा आदर्श वैद्य उदय धुरी यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून सर्वच साधकांसाठी अनुकरणीय आहेत.’

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक