‘वर्ष २०१८ पासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. काही दिवसांनी मला प्रशिक्षणाची आवड निर्माण झाली आणि प्रत्येक रविवारी मी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला जाऊ लागले.

१. सत्संगाला जाऊ लागल्यापासून गळ्यातील पदकामधील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रात जाणवलेले पालट
कुडाळ येथे १४.४.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा २५ वा वर्धापनदिन पार पडला. त्या वेळी मी प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेले पदक विकत घेतले होते. मागील मासापासून त्यातील छायाचित्रांमध्ये पालट झालेला दिसत आहे. कुडाळ येथील सनातनच्या सेवाकेंद्रात युवा सत्संग चालू झाला. त्या सत्संगाला मी प्रत्येक रविवारी जाऊ लागले. त्या युवा सत्संगामुळेच माझी व्यष्टी साधना (टीप) चालू झाली. मी प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा द्यायला आरंभ केला. त्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा मी ते पदक बघितले, तेव्हा मला त्यातील गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॅाक्टर आठवले यांच्या) छायाचित्रामध्ये पालट झालेला दिसला. त्यांचे छायाचित्र पूर्ण गुलाबी रंगाचे झाले होते. तेव्हापासून मी ठरवले की, ‘आता थांबायचे नाही. प्रतिदिन जोमाने प्रयत्न चालूच ठेवायचे. प्रतिदिन नामजप करायचा.’
टीप : व्यष्टी साधना म्हणजे ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न.’
२. पदक गळ्यात घातल्यापासून स्वतःत झालेले पालट
अ. ते पदक मी गळ्यात घालण्यापूर्वी मला पुष्कळ वाईट स्वप्ने पडायची आणि मला थोडी भीती वाटायची. मी ते पदक गळ्यात घातल्यापासून मला वाईट स्वप्ने पडणे पूर्णपणे बंद झाले. त्या दिवसापासून मला शांत झोप लागून भीती वाटणे उणावले.
आ. त्या पदकामधील पालट पाहिल्यापासून मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये जाण्याची इच्छा अधिकच वाढली. मला साधना करायलाही आवडू लागले. ते पदक घातल्यामुळेच मी आज साधनेचे प्रयत्न पुष्कळ चांगले करू शकत आहे.
मी याबद्दल गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. सिद्धी अनिल गावडे (वय १६ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (८.११.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |