आर्.टी.ओ. कार्यालयात संतांनी प्रवास केलेल्या वाहनाशी संबंधित सेवा करण्यास गेल्यावर साधकाला आध्यात्मिक विचारांचे अधिकारी भेटणे आणि विविध अनुभूती येणे
मला संतांनी प्रवास केलेल्या वाहनासंबंधी सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मला मोक्ष मिळाला नाही, तरी चालेल. ही सेवा मिळाली, म्हणजे मला मोक्षच मिळाला, असे मला वाटत होते. मी गुरुदेवांना प्रार्थना केली, हे भगवंता, माझा अहं न वाढता तुम्ही दिलेली सेवा तुम्हीच माझ्याकडून परिपूर्ण करवून घ्या.
१. संतांची गाडी आहे आणि देवाला अशक्य असे काहीच नाही, असे वाटणे
मला वाटले, संतांची गाडी आहे आणि आपले गुरुदेव तर विश्वचालक आहेत. देवाला अशक्य असे काहीच नाही. हे काम होईलच, याची मला निश्चिती वाटत होती. ते कसे होते ?, हे केवळ अनुभवण्याचा प्रयत्न करायचा, असे मला वाटले.
२. आर्.टी.ओ. कार्यालयात मोठ्या पदावर कार्यरत असणार्या आध्यात्मिक विचारांच्या साहेबांनी सेवा पूर्ण करूया, असे सांगणे
आर्.टी.ओ. कार्यालयात एक अधिकारी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या साहेबांनी यापूर्वीही मला साहाय्य केले होते. तेही आध्यात्मिक विचारांचे आहेत. मी त्यांना भेटलो आणि म्हणालो, हे वाहन संतांचे आहे आणि ही सेवा आमच्या गुरूंनी दिली आहे. ती आपणच पूर्ण करून द्या. त्यांना गाडीची कागदपत्रे दाखवली. ते म्हणाले, आपण मोठ्या मॅडमशी बोलून ही सेवा पूर्ण करूया.
२ अ. साहेब साईभक्त असणे, त्यांनी साईबाबांनी चिलीम पेटवण्यासाठी उत्पन्न केलेला अग्नी आणि पाणी या चमत्काराविषयी सांगत असतांना विशिष्ट गंध येणे : मी साहेबांशी अध्यात्माविषयी बोलत होतो. ते साईभक्त आहेत. ते वर्षातून २ – ३ वेळा मुंबई ते शिर्डी पायी प्रवास करतात. विशेष म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला असतांनाही ते शिर्डीला पायी चालत गेले होते. साहेबांनी साईबाबांनी चिलीम पेटवण्यासाठी चिमटा आपटून अग्नी आणि पाणी उत्पन्न केले, हा चमत्कार मला सांगितला. तेव्हा साहेबांना अकस्मात् खोकला आला आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. तेथे कसला तरी वास येत होता. मला काहीच कळत नव्हते. तेच म्हणाले, सिगारेटसारखा वास येतो का रे ? मी सभोवती पाहिले, तर मला कुणीच सिगारेट ओढत असलेले दिसले नाही. नंतर माझ्या लक्षात आले, हा अनुभूतीचा गंध आहे. मला हा गंध क्षणभर आला. अशा वेळी गजानन माऊली किंवा साईबाबा तिथे येऊन गेलेले असतात, असे मी ऐकून होतो.
२ आ. साहेबांना स्थानकापर्यंत पोचवायला गेल्यानंतर पुन्हा विशिष्ट गंध येणे : त्यानंतर कार्यालय बंद होण्याची वेळ झाली आणि मी साहेबांना स्थानकापर्यंत सोडले. त्यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आपण तर असे करत नाही; पण परेच्छा म्हणून मी हस्तांदोलन केले. त्यांनी पाठ वळवली आणि मीही वाहन फिरवले. तेव्हा मला तसाच गंध आला; मात्र तो पहिल्या वेळेपेक्षा अल्प काळ टिकला.
२ इ. साहेब त्यांना नृसिंहवाडी येथे आलेल्या अनुभूतीविषयी सांगत असतांना सुगंध येणे : दुसर्या दिवशी मी साहेबांशी बोलत असतांना ते म्हणाले, एकदा मी नृसिंहवाडीला गेलो होतो. तेथे गेल्यावर मी गुरुचरित्र वाचत असे किंवा शंकर महाराजांचे स्तवन करत असे. एकदा मी स्तवन वाचत असतांना अकस्मात् एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन अगदी शंकर महाराज बसतात, तशी बसली. ते याविषयी सांगत असतांना मला पुष्कळ सुगंध येत होता. मला वाटले, आपण नेहमी लावतो, तेच अत्तर असेल. हा सुगंध मला वेगळाच आनंददायी वाटला.
२ ई. साहेब श्री चिले महाराजांविषयी त्यांना आलेली अनुभूती सांगत असतांना त्यांच्या मुखातून गोड सुगंध येणे : नंतर त्यांनी सांगितले, कोल्हापूरजवळ श्री चिले महाराजांचे स्थान आहे. तेथे मला संकेत मिळाला, फेटा आणि शेला; म्हणून मी चिले महाराजांच्या स्थानी गेलो. तेथे मी अभिषेक केला आणि फेटा अन् शेला अर्पण केला. पहाटे पूजा झाल्यावर मी चहा पिण्याचा विचार करत असतांना एक महिला पुरुषी आवाजात म्हणाली, चल. तुला चहा हवा आहे ना ? मग मी चिले महाराजांच्या गादीवर जे महाराज असतात, त्यांच्याकडे गेलो. मला ही व्यक्ती चिले महाराजांची निस्सीम भक्त आहे, हे काहीच ठाऊक नव्हते. त्या महिलेने मला चहा दिला. मी चहा घेणार, तेवढ्यात ती व्यक्ती मला दिसली. ती व्यक्ती अगदी शांत बसलेली पाहून मला आठवण झाली की, मी एक पांढरे वस्त्र घेतले होते. मी हे वस्त्र त्या व्यक्तीला दिले आणि तिने ते पांघरले. त्या व्यक्तीने मला जोरदार फटका मारला. त्या वेळी मी ५ ते १० मिनिटे ध्यानावस्थेत गेलो आणि त्या वेळी मला पुष्कळ आध्यात्मिक लाभ झाला. साहेब हे सांगत असतांना मला त्यांच्या मुखातून गोड सुगंध येत होता.
– श्री. कृष्णा दत्तात्रेय आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |