(म्हणे) ‘शेतकरी उठला तर तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय रहाणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

  • शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्‍यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, असे कुणालाही वाटले, तर चूक ते काय ?
  • शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आहेत आणि किती जण साम्यवादी नेते आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – मी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांविषयी कवडीची आस्था नाही. पंजाब म्हणजे पाकिस्तान नाही. सरकार शेतकर्‍यांविषयी नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करण्याची आवश्यकता आहे. चर्चा न करता एका अधिवेशनात एका दिवसात हे कायदे आणले. हा घटनेचा अपमान आहे. कायदा बहुमताने पास कराल, पण एकदा या देशातील शेतकरी उठल्यानंतर कायदा मागे घ्या किंवा नको, तो उद्ध्वस्त केल्याशिवाय रहाणार नाही, अशी चेतवणी आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

१०० शेतकरी आणि कामगार संघटना यांनी एकत्र येऊन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा स्थापन करून मुंबईतील आझाद मैदानावर २५ जानेवारी या दिवशी हा सहस्रो शेतकर्‍यांनी मोर्चा काढला. देहलीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या या मोर्च्याचा उद्देश केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्‍यांच्या ३ कायद्यांना आणि कामगार कायद्यांना विरोध करणे हा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या मोर्च्यात सहभागी झाले होते. यानंतर हा मोर्चा राजभवनाकडे गेला. या वेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत होत्या.

(म्हणे) ‘अराजक निर्माण करा (‘कोहरम मचादो’) – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी

मोदी सरकारने कायदे रेटायचा प्रयत्न केला, तर ही पंजाबची हवा त्यांना संपवल्याशिवाय रहाणार नाही. अराजक निर्माण करा, अशी उघड चेतावणीच अबू आझमी यांनी या वेळी दिली.

(म्हणे) ‘सरकारला लक्ष्य केल्याशिवाय रहाणार नाही !’ – माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे

भाजपला विरोध करणार्‍या सर्व शक्ती एकत्र आल्या आहेत. असे देशभर झाले, तर सरकार गडगडल्याशिवाय रहाणार नाही. मोदी सरकारच्या असंवेदनशीलतेचा जळजळीत निषेध करत आहोत. हे जनतेच्या विरोधातील कायदे आहेत. या सरकारला लक्ष्य केल्याशिवाय रहाणार नाही.

(म्हणे) ‘सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय थांबवणार नाही !’ – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शेतकरी संपवण्याचे काम चालले आहे. या सरकारने विमाने, रेल्वे सर्व विकले, आता सातबारा विकायला निघाले आहे. सरकार भांडवलदारांकरिता काम करत आहे. या सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय थांबवणार नाही.

या मोर्च्यासाठी आदिवासींना गोळा करून आणले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्रे फडणवीस यांनी केली आहे.