गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

​२४ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १२)

भाग ११ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444623.html


सौ. मंगला मराठे

१६. आध्यात्मिक त्रासावर अभूतपूर्व संशोधन करून आणि त्यावर उपाय शोधून साधकांचे त्रास न्यून करणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

१६ अ. साधकांचे त्रास आणि ते न्यून करण्याचे उपाय यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले अभूतपूर्व  संशोधन !  

१६ अ १. साधकांची साधना होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांना त्रास देऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यावर मात करण्यासाठी विविध उपायपद्धती शोधणे : साधकांची साधना होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधनेत अडथळे आणून साधकांना आध्यात्मिक त्रास देतात. साधकांच्या साधनेतील हे अडथळे दूर करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर अखंड झटत होते. प्रथम अशा प्रकारचे आध्यात्मिक त्रास त्यांना स्वत:लाच होत होते. वाईट शक्ती त्यांच्यावर आक्रमण करत होत्या. तेव्हा ते तो सर्व त्रास सहन करत होते; मात्र जेव्हा साधकांनाही वाईट शक्तींचा त्रास होऊ लागला, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, माझ्या साधकांना त्रास दिलात, तर मी गप्प बसणार नाही. त्यानंतर त्यांनी या त्रासांवर मात करण्यासाठी साधकांसाठी नामजपादी उपाय करायला आरंभ केला. नामजप शोधणे, ध्यान लावणे, देवतेच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालणे, यज्ञ करणे, स्तोत्रपठण करणे, इतर संतांसमवेत नामजप, अशा अनेक प्रकारे त्यांनी साधकांसाठी उपाय करण्यास आरंभ केला.

१६ अ २. स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासांची पर्वा न करता घंटोन् घंटे साधकांसाठी नामजपादी उपाय करणे : परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत होणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे त्यांना स्वतःलाच विविध शारीरिक त्रास होत होते. त्यांना खाली भूमीवर बसून साधकांसाठी नामजपादी उपाय करणे शक्य व्हायचे नाही. जेव्हा साधकांना तीव्र त्रास होत होते, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर घंटोन् घंटे स्वतःच्या त्रासाची पर्वा न करता भूमीवर बसूनही साधकांसाठी अखंड उपाय करत होते. काही वेळा साधक त्रासामुळे अत्यंत त्रस्त होत, तेव्हा गुरुदेवांना पुष्कळ उठ-बस करावी लागत होती, तरीही ते चिकाटीने नामजपादी उपाय पूर्ण करून त्या साधकाचा त्रास न्यून करत होते.

१६ अ ३. साधकांना तीव्र त्रास होणार्‍या साधकांना साहाय्य करायला शिकवणे : एखाद्या आईला आपल्या मुलाला होणार्‍या त्रासाविषयी वाईट वाटते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांना साधकांना होणार्‍या त्रासांविषयी वाईट वाटत होते. त्रास होत असलेल्या साधकांकडे अन्य साधकांनी लक्ष कसे द्यायचे ? त्यांना कसे साहाय्य करायचे ?, हे त्यांनी आम्हाला शिकवले.

१६ आ. साधकांच्या त्रासाची तीव्रता स्वतः अनुभवून सतत त्यांची काळजी घेणारी गुरुमाऊली !

१६ आ १. एका साधिकेने त्रासाच्या वेळी डोके भिंतीवर आपटल्यावर स्वतःचे डोके त्याच प्रकारे भिंतीवर आपटून तिला किती लागले असेल ?, हे पहाणे : एकदा एका साधिकेला तीव्र त्रास होत होता. तेव्हा त्रासून तिने स्वतःचे डोके भिंतीवर ३ – ४ वेळा आपटून घेतले. तेव्हा अन्य साधकांनी तिला आवरले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधिकेप्रमाणेच त्या भिंतीवर स्वतःचे डोके आपटले आणि तिला किती लागले आणि किती दुखले असेल ? हे पाहिले. समोरच त्या साधिकेचे आई-वडील बसले होते. त्यांनी तिच्या आई-वडिलांना तिला विशेष लागलेले नाही, असे सांगितले.

१६ आ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या केवळ अस्तित्वानेही एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होणे, तेव्हा आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये यासाठी ते २ मास ती रहात असलेल्या आश्रमाच्या भागात न जाणे : एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता. ती साधिका परात्पर गुरु डॉक्टरांच्या जवळपास जरी गेली, तरी त्यांच्यातील चैतन्यामुळे तिला तीव्र त्रास होत होता. हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक असल्यामुळे ते २ मास ती साधिका आश्रमाच्या ज्या भागात रहात होती, त्या भागात गेलेही नाहीत.

१६ आ ३. नामजपादी उपायांच्या केवळ स्मरणानेही साधकांना तीव्र त्रास होणे, तेव्हा साधकांना त्रास होऊ नये; म्हणून लांबूनच त्यांची विचारपूस करणे : एका उपायांच्या सत्रात परात्पर गुरु डॉक्टरांनी ३ साधकांसाठी सलग ६ घंटे नामजपादी उपाय केले होते. त्यामुळे वाईट शक्तींची शक्ती अगदी न्यून झाली होती. त्या साधकांची प्राणशक्तीही अत्यंत न्यून झाली होती. त्या उपायांच्या केवळ स्मरणानेही पुन्हा साधिकांना तीव्र त्रास होत होता. त्या साधिकांना त्रास होऊ नये; म्हणून परात्पर गुरु डॉक्टर त्यांची अन्यांकडे विचारपूस करत होते.

१६ आ ४. तीव्र त्रास होत असलेल्या साधकाला भूमीवर झोपवल्यावर त्यांना चुकीची कठोर शब्दांत जाणीव करून देणे : एकदा एका साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता. ध्यानमंदिरातील चैतन्याचा लाभ होऊन त्याचा त्रास न्यून व्हावा; म्हणून त्याला ध्यानमंदिरात आणले. त्या साधकाला भूमीवर काही न अंथरताच झोपावे लागत आहे, हे आमच्यापैकी कुणाच्याही लक्षात आले नाही; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला या गोष्टीची कठोर शब्दांत जाणीव करून दिली.

​परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवरील प्रीती अवर्णनीय आहे. अशा अनेक लहान-मोठ्या प्रसंगातून त्यांची प्रीती अनुभवायला मिळते.

१६ आ ५. साधकांना तीव्र त्रास होत असल्यामुळे रात्रभर जागून साधकांसाठी नामजपादी उपाय करणे आणि दुसर्‍या दिवशीही विश्रांती न घेणे : साधकांच्या त्रासाचे प्रमाण वाढल्यावर पुष्कळ वेळा परात्पर गुरु डॉक्टर रात्रभर जागून त्यांच्यावर नामजपादी उपाय करत असत आणि तरीही ते दुसर्‍या दिवशी विश्रांती न घेता त्यांच्या नियमित सेवाही करत असत. असा त्यांचा हा दिनक्रम अनेक मास चालू होता.

१६ इ. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि अहंशून्य असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले ! : परात्पर गुरु डॉक्टर उपायांवरील संशोधन करत असतांना अनेक संतांना भेटत होते. ते संत अशा त्रासांवर काय उपाय करतात आणि त्याचा काय परिणाम होतो ? हे शिकण्यासाठी काही साधकांना समवेत घेऊन ते त्या संतांकडे जात होते. वर्ष १९९२ मध्ये त्यांनी प्रथमच आम्हाला एका संताकडे नेले होते. तिथे भूतबाधा झालेल्या अनेक व्यक्ती होत्या. त्यांच्यावर उपाय चालू होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी समवेत असलेल्या सर्व साधकांना तेथील स्पंदनांचा अभ्यास करायला लावला होता. आम्हा सर्वांसाठी हा विषय नवीनच होता. खरेतर, परात्पर गुरु डॉक्टरांची स्वतःची क्षमता, त्यांचे अस्तित्व आणि संकल्प यामुळे साधकांवर उपाय होत होते; परंतु त्या संतांनी सांगितलेल्या उपायांमुळे साधकांचे त्रास न्यून झाले, असेच ते म्हणत होते.

१६ ई. ज्ञानी आणि अनेक वर्षांची साधना असलेल्या वाईट शक्तींशीही आदराने बोलणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती आहेत, तरीही ते कधीच कुणाशीही अधिकारवाणीने बोलत नाहीत.  वाईट शक्तींशी त्यांचे सूक्ष्मातून युद्धच चालू असतांना ते त्या वाईट शक्तींशी प्रेमाने आणि आदराने बोलायचेे. ज्या वाईट शक्ती ज्ञानी आहेत आणि त्यांची अनेक वर्षांची साधना आहे, त्यांच्याशी ते कधीच एकेरी संबोधन करून बोलत नव्हते.

१६ उ. परात्पर गुरु डॉक्टरांनी संशोधनात्मक प्रयोगांचे चित्रीकरण करतांना प्रत्येक गोष्टीकडे स्वतः लक्ष देणे : आध्यात्मिक त्रासाविषयी अभ्यास आणि संशोधन करण्याच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर साधकांना आध्यात्मिक त्रास होत असतांना आणि त्यांवर आध्यात्मिक उपाय चालू असतांना त्याचे चित्रीकरण करण्यास सांगत होते. चित्रीकरण करतांना परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक पैलूकडे स्वतःच लक्ष देत होते. आध्यात्मिक त्रासांवर उपायही तेच करायचे आणि त्याच वेळी ते छायाचित्रकाचा कोन (कॅमेराचा अँगल), प्रकाश योजना, त्रास होत असतांना साधकांकडून केल्या जाणार्‍या विविध कृती इत्यादी सर्व गोष्टींकडे लक्ष देत होते. लौकिकदृष्ट्या त्यांना चित्रीकरणाचे तांत्रिक ज्ञान नसतांनाही चित्रीकरण करतांना झालेल्या सर्व चुकांची ते आम्हाला तत्परतेने जाणीव करून द्यायचे.

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)

(समाप्त)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक