सामान्य माणसाला दिलासा, तसेच सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांना प्रेरणा ! – शरद पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

  •  जिल्हा परिषद प्रांगणात यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण

  • कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्याकडून मास्क न वापरणे, सामाजिक अंतर यांसह कोरानाविषयक नियमांचे पालन नाही

कोल्हापूर, २२ जानेवारी – यशवंतराव चव्हाण यांना सामान्य माणसाप्रती आस्था होती. देशाचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद्भूषवणार्‍या चव्हाण साहेबांच्या पश्‍चात पुस्तके, ग्रंथ ही त्यांची एकमेव संपत्ती होती. पुतळा पाहिल्यावर सामान्य माणसाला दिलासा आणि भरवसा मिळेल. त्याच समवेत सदस्य, अधिकारी यांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केले. जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण २२ जानेवारी या दिवशी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

पोलीस क्रीडांगणावर लोकार्पण करण्यात आलेल्या ३९ रुग्णवाहिका

यानंतर पोलीस क्रीडांगणावर ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण, दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरण, राजर्षी शाहू पुरस्कार वितरण, तसेच आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण झाले. या प्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक, शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, तसेच अन्य उपस्थित होते.

क्षणचित्रे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वारंवार मास्क घाला अशी जागृती करण्यात येत असतांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह, जलसंपदामंत्री जयंत पाटील अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मास्क घातले नव्हते, तसेच सामाजिक अंतराचे पालन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते करत नसल्याचे दिसून आले. (जनता नेहमी लोकप्रतिनिधींचाच अनुयय करते. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनच मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा असे सांगते आणि दुसरीकडे जर शासनाचे मंत्री, लोकप्रतिनिधीींच जर कोरोनाविषयक नियमांचे पालन करत नसेल, तर जनतेने यातून काय बोध घ्यायचा ? दळणवळण बंदीच्या काळात जे नियम सामान्य नागरिकांना लागू आहेत, तेच नियम मंत्री, लोकप्रतिनिधी यांना का लागू नाहीत ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे ! – संपादक)