Ram Navami Procession Targeted : कोलकाता येथील श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचा भाजपचा दावा पोलिसांनी फेटाळला !

भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार

कोलकाता (बंगाल) –  कोलकात्यातील पार्क सर्कस सेव्हन परिसरात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. भगवे झेंडे असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली, असा दावा भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी केला.

१. केंद्रीय मंत्री मजुमदार यांनी ‘एक्स’ पोस्ट करून लिहिले की, येथे अराजकता पसरली होती. हा अपघात नव्हता, तर लक्ष्य करून केलेला हिंसाचार होता. या वेळी पोलीस कुठे होते ? मी पाहिले की, पोलीस गप्प होते. हे पोलीस दल जे स्वतः ममता बॅनर्जी यांनी निवडले होते. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे ते पूर्णपणे अपंग झाले आहेत. निष्पाप हिंदूंच्या संरक्षणासाठी एकही पाऊल उचलले गेले नाही. आम्ही कोलकात्याला वचन देतो की, पुढच्या वर्षी पार्क सर्कसमधून आम्ही श्रीरामनवमी आणखी मोठी आणि अधिक भव्य मिरवणूक काढू आणि तेच पोलीस जे आज गप्प राहिले आहेत, ते आमच्यावर पुष्पवृष्टी करतील.

२. भाजपच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना कोलकाता पोलिसांनी सांगितले की, कोणत्याही मिरवणुकीसाठी कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती किंवा परिसरात अशी कोणतीही कृती घडली नाही. वाहनाच्या हानीची झाल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ हस्तक्षेप केला आणि सुव्यवस्था पूर्ववत् केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोकांना कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.

३. पोलिसांच्या माहितीवर भाजपचे नेते तरुण ज्योती तिवारी यांनी म्हटले की, पार्क सर्कसमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी अनुमतीची आवश्यकता आहे का ? वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ येथे आयोजित केलेल्या सभेसाठी अनुमती घेण्यात आली होती का?

संपादकीय भूमिका

बंगालचे पोलीस कधीतरी हिंदूंच्या बाजूने बोलतील का ?